Top 10 News : अपात्र लाडक्या बहिणींना 9,605 कोटींचे वाटप, साखरेचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनाही फायदा आणि तापसीच्या वक्तव्यावर कंगना संतापली ,वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

अपात्र लाडक्या बहिणींना 9,605 कोटींचे वाटप
जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
Top 10 News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. ई-केवायसी, उत्पन्न मर्यादा आणि इतर निकषांकडे दुर्लक्ष करून हप्ते कसे देण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पडताळणीनंतर सक्रिय लाभार्थ्यांची संख्या 2.48 कोटींवरून 1.65 कोटींवर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार, याकडे आता लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
“शेतकऱ्यांनाही होणार फायदा”
साखरेच्या दरावर कृषिमंत्र्यांनी प्रतिक्रिया
ऐन श्रावणात साखरेच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. काही ठिकाणी 50 रुपये किलो मिळणारी साखर आता 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. इथेनॉल उत्पादन आणि साखरेच्या साठ्याविषयी चर्चा सुरू असताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दरवाढीवर प्रतिक्रिया दिली आहे. कारखान्यांकडे साखरेचा पुरेसा साठा नसल्याचे सांगत, वाढलेल्या दराचा काही प्रमाणात फायदा कारखाने आणि शेतकऱ्यांनाही होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, राज्यातील पावसाच्या असमानतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, चांगल्या पावसासाठी विठ्ठलाला साकडे घालावे लागेल, असेही भरणे म्हणाले.
गणेशोत्सवाच्या आनंदावर शोककळा!
२२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ कोसळला
मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान भीषण दुर्घटना घडली. २२ फुटांपेक्षा उंच ‘भुलेश्वरचा राजा’ गणपतीची मूर्ती अचानक कोसळल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. शनिवारी रात्री डॉ. आत्माराम मर्चंट रोड परिसरात ही घटना घडली. मृतांमध्ये गणपती मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि ३८ वर्षीय ब्रिजेश हेमंत जोशी यांचा समावेश असल्याची माहिती आहे. मूर्तीला आधार देणाऱ्या फ्रेमच्या वेल्डिंगमध्ये त्रुटी असल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
अभिजीत दिपके अडचणीत;
लातूरमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सुरू केलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानादरम्यान लातूरमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या. कमी पटसंख्येमुळे इतर शाळांतील विद्यार्थ्यांना बसवल्याचा आरोप तसेच निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, परवानगीशिवाय शाळेची पाहणी करणे, शिक्षकांना धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली दिपके यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शाळांचे वास्तव जनतेसमोर आणणे हा गुन्हा असेल, तर तो स्वीकारण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र;
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती
बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवत येलो अलर्ट जारी केला आहे. तर धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील नव्या हवामान प्रणालीच्या वाटचालीवर पुढील काही दिवसांतील पावसाचे चित्र अवलंबून राहणार आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर FSSAIचा बडगा;
नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह 150 हून अधिक नोटिसा
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोटे दावे आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने प्रमुख कंपन्यांविरोधात कडक कारवाई केली आहे. नेस्ले इंडिया, पेप्सिको आणि कोका-कोला इंडियासह विविध अन्न कंपन्यांना 150 हून अधिक नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही ई-कॉमर्स आणि खाद्यसेवा कंपन्यांनाही नोटिसा देण्यात आल्या असून काही ठिकाणी परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यानंतर अनेक कंपन्यांनी सुधारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे FSSAIने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले;
24 खलाशी बेपत्ता, बचावकार्य सुरू
बंगालच्या उपसागरात पारादीप बंदरातून लोहखनिजाची पूड घेऊन निघालेले पनामा ध्वजांकित मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओडिशाच्या किनाऱ्यापासून सुमारे 240 सागरी मैल दूर ही घटना घडली. जहाजावर 24 खलाशी असल्याची माहिती असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने शोध व बचाव मोहीम सुरू केली असून परिसरातील इतर जहाजांनाही सतर्क करण्यात आले आहे. जहाज बुडण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कॅनडाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका;
अमेरिकेवर टॅरिफ लादण्याची केली घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या सुमारे 20 अब्ज डॉलर मूल्याच्या उत्पादनांवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही देशांतील व्यापार तणाव वाढला आहे. या निर्णयाला कॅनडानेही जशास तसं प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 8 सप्टेंबरपासून अमेरिकेवर नवीन दंडात्मक शुल्क लागू करण्याची घोषणा केली असून पोलाद आणि दुग्धजन्य पदार्थांसह विविध क्षेत्रांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यापार करारावरील वाटाघाटी फिस्कटल्यानंतर सुरू झालेल्या या टॅरिफ संघर्षामुळे अमेरिका-कॅनडा संबंधांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या कसोटीत टीम इंडियात बदल?;
सारांश जैनला पदार्पणाची संधी?
गॉल याठिकाणी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी दमदार कामगिरी केली. मानव सुथारने तब्बल 10 बळी घेतले, तर रवींद्र जडेजाने चार विकेट्स मिळवल्या. मात्र कुलदीप यादवला केवळ एक बळी मिळाल्याने कोलंबोतील दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. कुलदीपच्या जागी मध्य प्रदेशचा अनुभवी फिरकीपटू सारांश जैनला पदार्पणाची संधी मिळू शकते. दरम्यान, श्रीलंकेनेही सलामीच्या फलंदाजात बदल करण्याचे संकेत दिले असून कामिल मिश्राला संधी मिळण्याची शक्यता आहे. रविवारी सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
तापसीच्या वक्तव्यावर कंगना संतापली;
‘स्वस्त कॉपी’ म्हणत आई-वडिलांनाही वादात ओढले
अभिनेत्री कंगना रनौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. एका कार्यक्रमात कंगनासोबतच्या वादाबाबत बोलताना तापसीने केलेल्या वक्तव्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली. तापसीने आपल्या संगोपन आणि दृष्टिकोनाबाबत अप्रत्यक्ष टिप्पणी केल्याचा आरोप करत कंगनाने तिला ‘स्वस्त कॉपी’ म्हटले. एवढेच नाही तर तिने तापसीच्या आई-वडिलांबाबतही सवाल उपस्थित केले. 2019 पासून सुरू असलेला दोघींमधील शाब्दिक संघर्ष तापसीच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.



