FDA seizes oil : एफडीएकडून २८,७५३ क्विंटल खाद्यतेल जप्त; ८० खाद्य व्यवसाय परवाने निलंबित
यापैकी ४६२ नमुने निर्धारित मानकांनुसार योग्य आढळले. मात्र, ४० नमुने निकृष्ट दर्जाचे, १८ असुरक्षित आणि ५ चुकीच्या लेबलिंगचे असल्याचे दिसून आले.

FDA seizes oil – राज्यात भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांच्या विक्रीविरुद्ध राबवलेल्या सात महिन्यांच्या मोहिमेदरम्यान १८.९५ कोटी रुपये किमतीचे २८,७५३ क्विंटल खाद्यतेल एफडीएने जप्त केले असून, ८० खाद्य व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
एफडीएने एका निवेदनात म्हटले आहे की, १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात १,०८९ ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कालावधीत १८.९४ कोटी रुपये मूल्याचे २८,७५३.३० क्विंटल खाद्यतेल जप्त करण्यात आले. तसेच, विभागाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी १,६६० नमुने गोळा केले आहेत.
या गोळा केलेल्या १,६६० नमुन्यांपैकी ४८५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४६२ नमुने निर्धारित मानकांनुसार योग्य आढळले. मात्र, ४० नमुने निकृष्ट दर्जाचे, १८ असुरक्षित आणि ५ चुकीच्या लेबलिंगचे असल्याचे दिसून आले. उर्वरित १,१७१ नमुन्यांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे.
विभागाने आपल्या सात विभागांतर्गत एकूण ८० खाद्य व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक २७ परवाने निलंबित करण्यात आले आहे. तसेच पुण्यात सर्वाधिक म्हणजे १९,५५१.८३ क्विंटल खाद्यतेल जप्त करण्यात आले.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५,७३६.२७ क्विंटल आणि कोकणात २,१४६.०६ क्विंटल खाद्यतेल जप्त केले. जप्त केलेल्या साठ्याचे मूल्य छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजेच ८.३४ कोटी रुपये इतके होते. त्यापाठोपाठ कोकणात ५.४४ कोटी रुपयांचा, तर पुण्यात २.६७ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.






