Nagpur Chlorine Gas leak : नागपूरात जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूगळती; अनेकजण रुग्णालयात दाखल
जवळपासच्या वस्त्यांमधील रहिवाशांना दूर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि उपचारासाठी अनेक लोकांना रुग्णालयात नेण्यात आले.

Nagpur Chlorine Gas leak – नागपूरमधील एका जलशुद्धीकरण प्रकल्पात सोमवारी मध्यरात्रीनंतर क्लोरीन वायूची गळती झाल्याने परिसरातील रहिवाशांची सुरक्षिततेसाठी धावपळ उडाली आणि अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
नागपूर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे १ वाजण्याच्या सुमारास गोधनी गावातील जलशुद्धीकरण प्रकल्पातील ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
हा वायू परिसरातील निवासी वस्त्यांमध्ये पसरल्याने घबराट निर्माण झाली. अनेकांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवला. त्यानंतर पोलिसांनी २०० मीटर त्रिज्येतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आणि बाधित परिसर सील केला.
जवळपासच्या वस्त्यांमधील रहिवाशांना दूर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि उपचारासाठी अनेक लोकांना रुग्णालयात नेण्यात आले, असे मनपाने म्हटले आहे.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दोन पाण्याचे बंब आणि श्वसन यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले. नागपुरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर प्रा. लि. चे कर्मचारी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले.
पहाटे ५.३० च्या सुमारास गळती थांबवल्यानंतर, एनडीआरएफचे पथक, अग्निशमन दलाचे जवान आणि ओसीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांनी तो क्लोरीन सिलिंडर कॉस्टिक सोडा मिसळलेल्या पाण्याच्या टाकीत ठेवला, असे मनपाने सांगितले.





