Manoj Jarange : “आमची पोरं फोडून, गद्दार तयार करून…”; मनोज जरांगे असं काय बोलून गेले? पाहा…
आमच्यात फूट पाडण्यासाठी आणि शिंदे-फडणवीसांच्या विरोधात अंतर्गत कारस्थाने करण्यासाठी जी टीम काम करत होती, त्या टीमचे सूत्रधार रामदास कदम स्वतःच असावेत.

Manoj Jarange – अंतरवलीमध्ये लाखो लोक मला भेटायला येतात. त्यातील कोणीतरी फोटो काढला आणि कदमांनी तो पत्रकार परिषदेत झळकावला. पण याचा अर्थ कदमांनी गेल्या 3 वर्षांपासून आमच्या आंदोलनात स्वतःचे हेर पेरले होते. आमची पोरं फोडून, गद्दार तयार करून असले फोटो गोळा करण्याचे उद्योग कदम करत होते, हे आता सिद्ध झाले आहे.
जर कदमांमध्ये हिंमत असेल तर त्या माणसाचे नाव त्यांनी जाहीर करावे. त्या गद्दाराला लोकांसमोर उभे करावे, उगाच हवेत गोळीबार करू नये. त्या व्यक्तीने मला काय दिले, त्याचे नाव काय, हे महाराष्ट्रासमोर सांगा. फुकटच्या धमक्या देऊन घाबरवण्याचे दिवस आता संपले आहेत, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिले.
मनोज जरांगे म्हणाले, टीव्हीवर क्लिप वाजण्याच्या 3 तास आधीच रामदास कदम यांना ती क्लिप कधीची आहे आणि तिची तारीख काय आहे, हे आधीच कसे समजले? 32 मिनिटांच्या क्लिपमधील वेळ आणि तारीख कदम यांना अगोदरच कशी माहिती झाली? हे फार मोठे गौडबंगाल आहे.
यावरून स्पष्ट होते की आमच्यात फूट पाडण्यासाठी आणि शिंदे-फडणवीसांच्या विरोधात अंतर्गत कारस्थाने करण्यासाठी जी टीम काम करत होती, त्या टीमचे सूत्रधार रामदास कदम स्वतःच असावेत. कारण मला ही क्लिप कोणी दिली याने तुम्हाला काय देणंघेणं? मी कोणाचीही मालकी पत्करलेली नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तपास यंत्रणा आहेत, ते त्याचा शोध घेतील. पण ज्या अर्थी रामदास कदमांना सर्व आतील माहिती आधीच होती, त्यावरून या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे कदमांपर्यंत पोहोचतात हे उघड झाले आहे, असा दावा त्यांनी केला.






