पिंपरी | पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

देहूरोड, (वार्ताहर) – निर्भय बनो या कार्यक्रमासाठी निघालेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी जीवघेणा हल्ला करत गाडीच्या काचा फोडून शाहीफेक केली. त्याचा निषेध करण्यासाठी मावळ तालुका युवक काँग्रेस व देहूरोड शहर युवक काँग्रेसच्या वतीने येथील मेन बाजारपेठेतील चौकामध्ये निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या घटनेचा निषेध करीत भाजप सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.
पत्रकार वागळे यांनी एक ट्विट केले होते. त्यावरून भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत “नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी ,भ्याड हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध, लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा करायचं काय खाली डोके वर पाय,” भाजप सरकारचा निषेध असो ” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव, पुणे ग्रामीण प्रभारी चंद्रशेखर जाधव, मावळ तालुका युवकाध्यक्ष राजेश वाघोले, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष गफूर शेख, देहूरोड युवकाध्यक्ष मलिक शेख, तालुका युवक उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले, उपाध्यक्ष राईस शेख, प्रदेश सोशल मीडिया समन्वयक वसीम शेख,निनाद हरपुडे, ऋषिकेश येवले, आसिफ सय्यद, निलेश बोडके, हितेशसिंह चहर, रहीम शेख आदी उपस्थित होते.





