‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटलांच्य विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहेत. अशातच आता जयंत पाटलांनी ‘माझं काही खरं नाही’, असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तसेच जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविषयीही मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आज बुधवारी (दि. १२) मुबंईत शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन झाले.
या पार्शवभूमीवर आझाद मैदानात कोल्हापूर आणि सांगलीसह बारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी आपल्या कुटुंबासह आंदोलनासाठी आले आहेत. या आंदोलनकर्त्यांना भेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ‘आमचा दारुण पराभव झाला आहे. आम्ही बोलायचं हळहळू कमी झालो आहे. कारण, बोलून लोकांना काही समजत नाही. गंभीर प्रश्नांपेक्षा इतर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी प्रसार माध्यमांद्वारे, सोशल मीडियाद्वारे लोकांच्या मनावर बिंबवले जात आहेत. पण, तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल. राजू शेट्टी यांनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवू नका. माझं काही खरं नाही, असं विधान जयंत पाटलांनी केलं आहे.
तर राजू शेट्टी खासदार झाले असते
लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले, राजू शेट्टी हे आमचा सल्ला ऐकत नाही. लोकसभेला त्यांनी माझे ऐकले असते, तर ते खासदार राहिले असते. आता आपली एकी कायम ठेवा. तसेच संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असे देखील पाटील यांनी म्हटले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला. शेट्टी यांना चांगलेच माहिती आहे, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना त्याचा अनुभव आला आहे. आम्ही सर्वजण भाषण करुन दमलो आहोत. कारण नागरिकांना पैसे देऊन शांत केले जाते. त्यातच हिंदुत्व समोर असते. आता तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल, असंही जयंत पाटील म्हणाले.




