पिंपरी | खड्ड्यांमध्ये झाडे लावून प्रशासनाचा निषेध

कार्ला, (वार्ताहर) – एकविरादेवी मंदिराकडे जाणाऱ्या वेहेरगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अनेकदा दुचाकी वाहनांचे अपघात होतात. तसेच रिक्षा आणि चारचाकी वाहन चालकांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागते.
या पार्श्वभूमीवर वेहेरगाव येथील ग्रामस्थ कैलास पडवळ, रंगनाथ पडवळ, संजय देवकर, प्रविण गायकवाड, मिलिंद बोरकर, नामदेव बोत्रे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये झाडे लावत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला.
एकविरा देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून वर्षभर भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. भाविकांना अशा खड्डेयुक्त रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे खड्ड्यांकडे सपशेल दुर्लक्ष झालेले असून किमान पावसाळ्यापूर्वी हे खड्डे भरणे गरजेचे होते. मात्र, तसे कोणतेही काम करण्यात आले नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले.





