Water Security: पुणे महानगर क्षेत्राच्या जलसुरक्षेसाठी २५ वर्षांचा आराखडा!
Water Security:

२०५१ पर्यंतच्या पाण्याची मागणी, उपलब्ध स्रोत आणि संभाव्य टंचाईचा अभ्यास; शासनाकडून अभ्यासगटाची स्थापना
Water Security: झपाट्याने वाढणारे नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि लोकसंख्येमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्रातील पाण्याची गरज आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
या पार्श्वभूमीवर सन २०५१ पर्यंतची पाण्याची मागणी, उपलब्ध जलस्रोत, संभाव्य टंचाई आणि पर्यायी स्रोतांचा अभ्यास करून दीर्घकालीन जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने अभ्यासगट स्थापन केला आहे.
पुणे महानगर प्रदेशात महापालिका, नगरपालिका, औद्योगिक क्षेत्रे आणि ग्रामीण भागांचा समावेश आहे. सध्या जलसंपदा विभागाच्या धरणांमधून या प्रदेशाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वाढती लोकसंख्या, औद्योगिक व व्यावसायिक विकास आणि प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची मागणी आणि उपलब्धता यामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षांचे एकत्रित जलनियोजन करण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुवे यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यासगट काम करणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरचे संचालक, एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सदस्य असतील. जलसंपदा विभागाचे सोलापूर येथील मुख्य अभियंता सदस्य सचिव असतील. तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सन २०३१, २०४१ आणि २०५१ या टप्प्यांतील घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, संस्थात्मक आणि बांधकाम क्षेत्राची पाण्याची मागणी निश्चित केली जाणार आहे. उपलब्ध जलस्रोत, मंजूर पाणी आरक्षण आणि संभाव्य टंचाईचा आढावा घेऊन नवीन जलस्रोत, जलसाठे व पाणीपुरवठा योजनांचे प्राधान्यक्रम ठरवले जातील.
त्यांचा खर्च, अंमलबजावणीचे वेळापत्रक आणि विभागांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर, पावसाचे पाणी संधारण, भूजल पुनर्भरण, जलवाहिन्यांतील गळती रोखणे आणि हवामान बदलामुळे जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय उपसचिव सविता बोधेकर यांनी जारी केला आहे.





