Pune Sights: गणेशोत्सवाच्या देखाव्यांनी पुणे उजळले
Pune Sights:

रस्त्यांवर भाविकांची गर्दी, दुसऱ्या दिवसापासूनच मध्यवर्ती भागात नागरिकांची लगबग
Pune Sights: – शहर आणि उपनगरांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, उत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांवर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सायंकाळनंतर नागरिक कुटुंबासह मध्यवर्ती भागात बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मानाचे गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे आकर्षक देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावर भाविकांचा ओघ वाढला आहे.
यंदा अनेक मंडळांनी केवळ भव्यता न दाखवता सामाजिक संदेश, पर्यावरण रक्षण आणि ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखावे साकारल्याने नागरिकांकडून विशेष दाद मिळत आहे.
तरुणाईमध्ये विशेष उत्साह दिसून येत असून, आकर्षक रोषणाई आणि देखाव्यांसमोर रील्स तसेच सेल्फी काढण्यासाठी गणेशभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे चोख नियोजन करण्यात आले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत शहरात देखावे पाहण्यासाठी आणखी गर्दी होणार असल्याची चिन्हे आहेत.





