Pune News : कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक
जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा आगीने रौद्ररूप धारण केले होते. तसेच मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. त्यामुळे जवानांनी सर्वप्रथम इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले.

Pune News : कोंढवा येथील भाग्योदयनगर परिसरातील एका चार मजली इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये पहाटे भीषण आग लागली. या आगीत १६ दुचाकी, एक तीनचाकी आणि एका चारचाकी वाहनासह एकूण १८ वाहने जळून खाक झाली.
आगीमुळे इमारतीतील लिफ्ट आणि इलेक्ट्रिक वायरिंगचेही मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत इमारतीतील सुमारे ३५ रहिवाशांना सुरक्षितपणे गच्चीवर हलविले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
ही घटना रविवारी (२२ नोव्हेंबर) पहाटे ३ वाजून १९ मिनिटांनी लेन क्रमांक ३४, भाग्योदयनगर, कोंढवा येथे घडली. इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच कोंढवा अग्निशमन केंद्राची तीन वाहने घटनास्थळी रवाना झाली.
जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा आगीने रौद्ररूप धारण केले होते. तसेच मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. त्यामुळे जवानांनी सर्वप्रथम इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. सुमारे ३५ रहिवाशांना गच्चीवर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
त्यानंतर श्वसन यंत्र परिधान करून जवानांनी धुरातून पार्किंगमध्ये प्रवेश केला आणि पाण्याचा मारा सुरू केला. आग शेजारील इमारतीत पसरू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. जवानांनी अवघ्या २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले.
मात्र, तोपर्यंत पार्किंगमधील १६ दुचाकी, एक तीनचाकी आणि एक चारचाकी वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. तसेच लिफ्ट आणि इमारतीतील इलेक्ट्रिक वायरिंगचेही नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या बचावकार्यामध्ये वाहनचालक राहुल जाधव, राहुल मखरे तसेच अग्निशमन जवान सागर दळवी, रितेश मोरे, शैलेश दवणे, अभिजित थळकर, तेजस खरिवले, राहुल दळवी, संतोष माने, प्रसाद शिंदे, सूरज माळवदकर, अक्षय चव्हाण आणि अभिषेक कसबे यांनी सहभाग घेतला.





