Pune News : दुष्काळात तेरावा महिना.! जलवाहिनी फुटून दहा लाख लिटर पाणी वाया
यामुळे सुमारे १० लाख लिटर (एक एमएलडी) पाणी वाया गेले असून, तब्बल तीन चार मजल्यापर्यंत पाण्याचे कारंजे निर्माण होऊन त्या भागात पाण्याचे अक्षरश: तळे निर्माण झाले होते.

Pune News – वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून मोहम्मदवाडीला पाणीपुरवठा करणारी १,४०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी रविवारी दुपारी दोन वाजता शिवसृष्टी येथील ऐश्वर्या बँक्वेट हॉलजवळ फुटली.
यामुळे सुमारे १० लाख लिटर (एक एमएलडी) पाणी वाया गेले असून, तब्बल तीन चार मजल्यापर्यंत पाण्याचे कारंजे निर्माण होऊन त्या भागात पाण्याचे अक्षरश: तळे निर्माण झाले होते. या जलवाहिनीचे काम सोमवारी सकाळपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच पथकाने दुपारी दोन वाजून सहा मिनिटांनी या जलवाहिनीत पाणी पंप करणे थांबवले, तरीही साचलेल्या पाण्याचे कारंजे उडतच होते. घटनास्थळ सखल भागात असल्याने त्या ठिकाणी जलवाहिनीतील दाब जास्त असतो.
जलवाहिनी टाकताना रस्ता अरुंद होता, तसेच रस्त्याखाली पाण्याच्या वाहिन्या, विद्युत केबल्स आणि मलनिस्सारण वाहिन्या असल्याने कामासाठी जागा मर्यादित होती.
त्यामुळे त्या ठिकाणी वेल्डिंगच्या जोडाची अपेक्षित गुणवत्ता राखण्यात अडचणी आल्या. या बाबी जलवाहिनी फुटण्यास कारणीभूत ठरल्या असण्याची शक्यता असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
ही जलवाहिनी २३ किमी लांबीची असून, तिच्यावर सुमारे ३,००० वेल्डिंगचे जोड आहेत. बांधकामादरम्यान गुणवत्ता तपासणीसाठी बहुतांश भागांत जलदाब चाचणी (हायड्रोस्टॅटिक टेस्ट) करण्यात आली. ज्या भागांत ही चाचणी करणे शक्य नव्हते, तिथे वेल्डिंगच्या जोडांची अल्ट्रासोनिक चाचणी केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
टेस्टिंगमध्ये ढिसाळपणा?
समान पाणीपुरवठा योजनेतील ही जलवाहिनी दुसऱ्यांदा फुटली आहे. हायड्रोलिक टेस्टिंग करूनही जलवाहिनी फुटली आहे. गॅप क्लोजिंग केल्यानंतर त्याचे टेस्टिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यामध्ये पाणीभरून हाय प्रेशर देऊन २४ तासाचे प्रेशर मेंटेन करायचे आणि त्यानंतर त्याची गळती आणि दाब तपासायचा असतो.
मात्र, यामध्ये ढिसाळपणा केल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे. गाफील राहिल्यामुळे, तसेच सल्लागार आणि प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ही जलवाहिनी दुसऱ्यांदा फुटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.





