NEET UG Exam: नीट’ परीक्षेसाठी पुण्यात कडेकोट बंदोबस्त; प्रत्येक केंद्रावर २० पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा
NEET UG Exam: पुणे शहर आणि जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर होणार 'नीट' परीक्षा; सुरक्षेच्या पाश्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केंद्रांची पाहणी पूर्ण.

NEET UG Exam – पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरात चर्चेत आलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुमारे २० पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात ३६, तर शहरात २७ परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा होणार आहे. या सर्व केंद्रांची पाहणी संबंधित पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केली असून, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा ठेवण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रियेचे रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. मागील काही स्पर्धा परीक्षांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना समोर आल्याने यंदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. (NEET UG Exam)
संशयास्पद हालचाली, अफवा किंवा पेपरफुटीशी संबंधित संदेशांवर सायबर पोलिसांकडून बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस मदतीच्या भूमिकेत राहणार आहेत. पार्किंग व्यवस्थेपासून परीक्षा केंद्रापर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पोलीस कर्मचारी पार पाडणार आहेत. याशिवाय परीक्षा केंद्र परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
सुरक्षा व मदतीला प्राधान्य (NEET UG Exam)

NEET UG Exam: नीट’ परीक्षेसाठी पुण्यात कडेकोट बंदोबस्त; प्रत्येक केंद्रावर २० पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा
विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देण्यात आले असून, विद्यार्थी आणि पालकांशी संवेदनशीलतेने व सहकार्याच्या भावनेतून वागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर सुरक्षा आणि मदत या दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.





