SPPU News : अमोल कोल्हेंना विरोध कशासाठी? पुणे विद्यापीठात दोन गट आमने-सामने, पाहा नेमकं काय घडलं?
SPPU News : शिवजयंती व्याख्यानासाठी डॉ. अमोल कोल्हेंच्या निवडीवर आक्षेप, कुलगुरूंच्या उपस्थितीत तणावपूर्ण वातावरणात सोहळा यशस्वी.

SPPU News – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे व्याख्यान काही विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतरही शुक्रवारी कडक पोलीस बंदोबस्तात पार पडले. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या वक्त्याच्या निवडीवरून विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्याने विद्यापीठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, प्रशासनाने वेळेत खबरदारी घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता हे व्याख्यान शांततेत पार पडले. विद्यापीठाच्या परंपरेनुसार दरवर्षी शिवजयंतीनिमित्त एका नामवंत वक्त्याचे व्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षी ही जबाबदारी डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर सोपविली होती. शुक्रवारी दुपारी चार वाजता व्याख्यानाची वेळ निश्चित करण्यात आली होती.
मात्र, एका राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीची वक्ते म्हणून निवड करताना विश्वासात का घेतले नाही, असा जाब विचारत काही विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमाला कडाडून विरोध केला. त्यामुळे वादाला तोंड फुटले. एका बाजूने विरोध होत असतानाच, दुसरीकडे अन्य काही विद्यार्थी संघटना डॉ. कोल्हे यांच्या समर्थनार्थ सरसावल्या.
नियोजित व्याख्यान कोणत्याही परिस्थितीत आणि नियोजित वेळेतच झाले पाहिजे, अशी ठाम मागणी या संघटनांनी लावून धरली. संघटनांमधील मतभेदामुळे विद्यापीठातील वातावरण चांगलेच तापले होते. या तणावपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत, इरावती कर्वे संकुलातील छत्रपती संभाजी महाराज सभागृह परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
या विरोधाच्या आणि तणावाच्या छायेतच अमोल कोल्हे यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. पराग काळकर, कुलसचिव डॉ. चारुशीला गायके आणि प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते.

