Pune : महात्मा फुलेंच्या विचारातच समकालीन प्रश्नांची उत्तरे; कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचे प्रतिपादन
Pune : महात्मा जोतिराव फुले आणि आजची तरुणाई या विषयावर पुण्यात राष्ट्रीय कार्यशाळा. महात्मा फुलेंच्या विचारांची आजच्या सामाजिक प्रश्नांशी सांगड घालण्याचे आवाहन.

Pune : दुष्काळ आणि सामाजिक विषमता यांसारख्या आजच्या गंभीर प्रश्नांवर मात करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समजून घेणे काळाची गरज आहे. महात्मा फुलेंनी केवळ विचार मांडले नाहीत, तर स्वतःच्या कृतीतून समाजासमोर आदर्श उभा केला. तरुणाईने हाच मंत्र आत्मसात करून कार्यप्रवण व्हावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महात्मा जोतिराव फुले आणि आजची तरुणाई’ या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी विद्यापीठाचे ‘एनबीटी’चे विश्वस्त राजेश पांडे, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी आणि प्रा. गणेश राऊत उपस्थित होते. राजेश पांडे यांच्या पुढाकारातून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. सोनवणे म्हणाले की, महाराष्ट्रातील दुष्काळाच्या समस्येवर महात्मा फुलेंनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ ग्रंथातून पाणी व्यवस्थापन व उपायांची दिशा दाखवली आहे. सत्यशोधक दृष्टिकोनातून त्यांनी सर्व समाजाच्या प्रश्नांवर काम केले. नव्या शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञानपरंपरेचे विज्ञान समजून घेताना फुलेंचा तर्कशुद्ध विचार महत्त्वाचा ठरतो.
तरुणाईच्या हातात देशाचे भवितव्य –
सन २०३५ मध्ये भारत हा जगातील सर्वांत तरुण देश असेल. पुढील पंचवीस वर्षे ही भारतीय तरुणाईची आहेत. या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंट’चा सकारात्मक उपयोग करून संधीचे सोने करायचे असेल, तर ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या नव्या पिढ्यांनी विविध दृष्टिकोनांतून विचारप्रवण झाले पाहिजे,’ असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक राजेश पांडे यांनी केले.





