Pune News : माजी विरोधीपक्ष नेते ठेवणार आता महापालिकेच्या कारभारावर नजर
महापालिकेतील विविध काळात विरोधीपक्ष नेते म्हणून काम केलेले माजी नगरसेवक आता शहराच्या प्रश्नांवर पुन्हा एकत्र येणार आहेत.

Pune News : महापालिकेतील विविध काळात विरोधीपक्ष नेते म्हणून काम केलेले माजी नगरसेवक आता शहराच्या प्रश्नांवर पुन्हा एकत्र येणार आहेत. ‘पुणे विरोधीपक्ष नेते संघटना (POLO)’ या नावाने स्वतंत्र संघटना स्थापन करण्यात येणार असून, महापालिकेतील विकासकामे, रखडलेले प्रकल्प, प्रशासनाचा कारभार आणि सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांवर संयुक्तपणे लक्ष ठेवण्याचा निर्धार या माजी विरोधीपक्ष नेत्यांनी केला आहे.
आमदार चेतन तुपे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत या नव्या संघटनेची घोषणा केली. ते म्हणाले, महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत ३१ जणांनी विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळली असून त्यापैकी २२ माजी विरोधीपक्ष नेते सध्या हयात आहेत. काही ज्येष्ठ नेत्यांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नसला तरी सर्वांना या उपक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
तुपे म्हणाले, विरोधीपक्षाची भूमिका ही केवळ सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यापुरती मर्यादित नसते. शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या संकल्पना आणि प्रकल्प माजी विरोधीपक्ष नेत्यांनी पुढे आणले. संख्याबळ नसल्याने अनेकांना महापौर होण्याची संधी मिळाली नाही, मात्र विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी प्रभावीपणे सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला आणि शहरहिताचे प्रश्न लावून धरले.
‘पुणे विरोधीपक्ष नेते संघटना (POLO)’च्या माध्यमातून रखडलेल्या विकास प्रकल्पांचा पाठपुरावा, नव्या योजनांबाबत सूचना, पुणेकरांच्या समस्या प्रशासनापुढे मांडणे तसेच महापालिकेच्या कारभारात जिथे त्रुटी आढळतील, तिथे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आवाज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ही संघटना पुणेकरांचा आवाज म्हणून काम करेल असे यावेळी बागुल यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला माजी विरोधीपक्ष नेते दत्ता सगरे, आबा बागुल, उज्ज्वल केसकर, वसंत मोरे, सुहास कुलकर्णी, दिपाली धुमाळ आणि अविनाश साळवे उपस्थित होते.





