Leak in the water pipeline: चांदणी चौकात मुख्य जलवाहिनीला गळती!
Leak in the water pipeline:

हजारो लिटर पाणी वाया; पाणीकपात असूनही दुरुस्ती नाही; नागरिकांमध्ये नाराजी
Leak in the water pipeline:शहरात अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू असताना दुसरीकडे चांदणी चौकात मात्र मुख्य जलवाहिनीतून गेल्या अनेक दिवसांपासून २४ तास पाणीगळती सुरू आहे.
उंचावरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असतानाही महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष करीत ही गळती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
चांदणी चौक परिसरातील टेकडीवर महापालिकेने पाण्याची मोठी साठवण टाकी उभारली आहे. या टाकीतून कोथरूड, बावधन आणि बाणेर-पाषाण परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. टाकीतून कोथरूडकडे जाणारी मुख्य जलवाहिनी चांदणी चौक परिसरातून उतारावरून जाते.
या ठिकाणी जलवाहिनी उंचावर असून, लगतच्या टेकडीचा काही भाग रस्ता तयार करण्यासाठी तोडण्यात आला आहे. त्यामुळे जलवाहिनीला गळती लागल्यानंतर त्यातून बाहेर पडणारे पाणी थेट उंचावरून रस्त्यावर कोसळत आहे.
मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत आहे. विशेष म्हणजे, ही गळती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. परिसरातील जागरूक नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करून पाठपुरावा केला आहे.
मात्र, अद्याप गळती बंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून, नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
सध्या धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने शहरात पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे. त्याचबरोबर आठवड्यातून एक दिवस पाणीकपातही केली जात आहे. नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाला मुख्य जलवाहिनीतील गळती रोखण्यात मात्र अपयश येत असल्याने महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पाणीगळती रोखण्याबाबत पालिका प्रशासन उदासीन
याविषयी माहिती देताना नागरी हक्क संस्थेचे सुधीर उर्फ काका कुलकर्णी यांनी सांगितले की, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात जलवाहिनीतील गळती शोधण्यासाठी आणि ती कायमस्वरूपी बंद करण्यासाठी विविध यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामुळे चांदणी चौकातील गळती शोधून तिची दुरुस्ती करणे सहज शक्य आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पाणीगळती रोखण्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.





