Laxmi Road: लक्ष्मी रस्त्यावर आता ‘पे अँड पार्क’! महापालिकेच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला फटका?
Laxmi Road: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेचा प्रयोग; लक्ष्मी रस्ता अन् विमाननगरमध्ये पे अँड पार्कचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर.

Laxmi Road : महापालिकेने शहरातील प्रमुख सहा रस्त्यांवर पे अँड पार्क धोरण प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात शहरातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यापासून होणार आहे. याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रकल्प विभागाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवला असून, लक्ष्मी रस्त्याबरोबर विमाननगर रस्त्याचाही प्रस्ताव सादर केला आहे.
वाहतूक कोंडीला मुख्य रस्त्यांवरील पार्किंग जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून हा प्रस्ताव तयार केला असला तरी पालिकेचे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. लक्ष्मी रस्त्यावर तेथील दुकानदारांचे कर्मचारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने उभी असतात. त्यामुळे येथे पे अँड पार्क योजना लागू झाल्यास त्याचा थेट परिणाम व्यापारावर होण्याची शक्यता आहे.
महापालिकेने पे अँड पार्क योजनेसाठी २ कोटी ९२ लाख ६१ हजार ९०४ रुपयांची निविदा काढली होती. प्रत्यक्षात ३९ टक्के कमी दराने निविदा आली. पी.बी.पी. ग्रुपने १ कोटी ७७ लाख ३५ हजार ६४० रुपयांत हे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. पालिकेने सात वर्षांपूर्वी सहा प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक वाहनतळ धोरणाची प्रायोगिक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी दोन वेळा निविदाही मागवल्या. या रस्त्यांमध्ये लक्ष्मी रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट, बिबवेवाडी रस्ता, गाडगीळ महाराज रस्ता, नामदार गोखले रस्ता (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) आणि विमाननगर रस्ता यांचा समावेश होता. सध्या लक्ष्मी रस्ता, विमाननगर रस्त्यांवरील निविदा मंजुरीसाठी ठेवल्या आहेत.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलीस संयुक्तपणे प्रयत्न करत असल्याचा दावा प्रशासनाने प्रस्तावात केला आहे. प्रमुख चौक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याबरोबरच वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने नियंत्रित करण्यासाठी पे अँड पार्क योजना आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
व्यापाराला फटका
लक्ष्मी रस्ता शहरातील सर्वात मोठी, ऐतिहासिक बाजारपेठ आहे. येथे हजारो कामगार विविध दुकानांमध्ये कार्यरत असून ते दररोज पी-१ आणि पी-२ नियमानुसार रस्त्यालगत वाहने उभी करतात. तसेच, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही ही सोय उपलब्ध आहे. जुन्या पुण्यातील बहुतांश व्यावसायिक इमारतींमध्ये स्वतंत्र पार्किंग नसल्याने रस्त्यावरील पार्किंगवरच व्यापारी, ग्राहक अवलंबून आहेत.
राज्यातून मोठ्या संख्येने ग्राहक लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी येतात. या भागात महापालिकेने अद्याप पुरेशा सार्वजनिक वाहनतळांची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पे अँड पार्क योजना लागू झाल्यास कर्मचारी, ग्राहकांना शुल्क भरावे लागेल. त्याचा परिणाम ग्राहकांची संख्या आणि व्यापारावर होण्याची भीती व्यापारी व्यक्त करतात.





