Tulapur Fire Accident : तुळापूरमध्ये भीषण दुर्घटना! शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग, दोन बैल व घोडीचा दुर्दैवी मृत्यू
Tulapur Fire Accident : घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कंद यांनी घटनास्थळी केली पाहणी; जखमी जनावरांवर उपचार सुरू, शासनाकडे मदतीची मागणी.

Tulapur Fire Accident – हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र तुळापूर येथील शिवले वस्तीमध्ये शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला भीषण आग लागून दोन बैल आणि एका घोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या आगीत एक बैल गंभीर जखमी झाला असून शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक पोपट शिवले यांच्या गोठ्यात ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप वसंतराव कंद यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
यावेळी त्यांनी शिवले कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच जखमी जनावराच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकार्यांना तातडीने सूचना दिल्या. प्रदीप कंद यांनी प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानीचा पंचनामा त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून नुकसानग्रस्त कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी तुळापूरचे माजी सरपंच जयवंत शिवले, गणेश पुजारी, उद्योजक संजय चव्हाण, सोपान शिवले, पोलीस मित्र आण्णासाहेब शिवले यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेमुळे तुळापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
“शेतकर्यांसाठी जनावरे ही केवळ संपत्ती नसून कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असतात. तुळापूर येथील ही घटना अत्यंत वेदनादायी असून शिवले कुटुंबावर मोठे संकट आले आहे. शासनाने तातडीने मदत करून नुकसानग्रस्त कुटुंबाला दिलासा द्यावा. मी स्वतः प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”
– प्रदीप वसंतराव कंद





