प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर( शेरखान शेख ) – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी शासनाकडून ५३२.५१ कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. या विकासामुळे वढू बुद्रुकसह आजूबाजूच्या गावांना देखील मोठा फायदा होणार असून, परिसरात आर्थिक आणि उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असून, बाजूला नदीच्या पलिकडे तुळापूर (ता. हवेली) येथे त्यांचे बलिदान स्थळ आहे. या दोन्ही गावांच्या मध्यातून भीमा नदी वाहते. तुळापूर येथे भीमा, भामा आणि इंदायणी या तीन नद्यांचा संगम असल्याने या भागाला विशेष महत्त्व आहे. या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी शासनाने प्रथम २०० कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर वढू आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणांचा विचार करत, दोन्ही गावांना जोडणाऱ्या नदीवरील पूल आणि आजूबाजूच्या रस्त्यांच्या विकास आराखड्यात समावेश करून विकास निधीची तरतूद आता ५३२.५१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या विकासामुळे परिसरातील शेतकरी देखील समाधानी आहेत.स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर बलिदान स्थळी संग्रहालय, थ्री-डी शो सभागृह, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृह यांची कामे सुरू आहेत. तसेच, समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे संग्रहालय, प्रशासकीय इमारत, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृहाची कामे सुरू आहेत. या दोन्ही ठिकाणी शंभर फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्यात येणार असल्याने शिरूर आणि हवेली तालुक्याला आगळेवेगळे वैभव प्राप्त होणार आहे. महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी नागरिकांना येथे पुन्हा येण्याची इच्छा होईल, असा विकास करण्याचा शासनाचा मानस आहे. वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास झाल्यानंतर देशभरातून येणाऱ्या शंभू भक्तांमुळे आजूबाजूच्या हॉटेलसह विविध दुकानांसाठी एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच, परिसरातील शेतकऱ्यांना देखील भाजीपाला विक्रीच्या माध्यमातून लघु उद्योग निर्माण होणार आहे.