Indapur News : मृत्यूचा खेळ की प्रसिद्धीचा हव्यास? इंदापूर बायपासवर भरधाव कारमधून युवकाचा जीवघेणा स्टंट
Indapur News : पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या कारमधून जीवघेणी स्टंटबाजी; रिल स्टार्सच्या विकृत प्रकारामुळे इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात.

Indapur News – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बायपास येथे भरधाव कारमधून करण्यात आलेल्या जीवघेण्या स्टंटबाजीने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. महामार्गावर वेगाने धावणार्या कारच्या खिडकीतून युवकाने अर्धे शरीर बाहेर काढत केलेला धिंगाणा आणि बेफाम डान्स यामुळे मृत्यूचा खेळ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
या थरारक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. क्रमांकाची लाल रंगाची कार (एमएच 14 जेई 9389) पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव वेगात धावत असताना काही युवकांनी कारमधून धोकादायक स्टंट सुरू केले. व्हिडिओमध्ये युवक खिडकीबाहेर लोंबकळत नाचताना दिसत असून चालक मात्र वेगावर नियंत्रण न ठेवता बेदरकारपणे वाहन चालवत होता.
काही क्षणांसाठी महामार्गावरील इतर वाहनचालकांचाही जीव धोक्यात आल्याचे दृश्य पाहायला मिळाले. राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असताना अशा प्रकारची स्टंटबाजी मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणारी असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. क्षणिक प्रसिद्धीसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणार्या अशा विकृत प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधित कारचालक आणि युवकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महामार्ग पोलिस आणि वाहतूक विभागाने अशा बेफाम वाहनचालकांना वेळीच लगाम घालण्याची गरज व्यक्त होत आहे.





