पुणे जिल्हा | साखर कामगारांचा उद्या आयुक्तालयावर मोर्चा

भवानीनगर, (वार्ताहर) – राज्यातील साखर कामगार साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे 7 ऑगस्टला धडकणार असून मोठ्या संख्येने कामगार मोर्चात सहभागी होतील, असे राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांना यापूर्वी झालेल्या वेतनवाढ व सेवा शर्तीचे त्रिपक्षीय कराराची मुदत 31 मार्च 2024 ला संपुष्टात आल्याने उद्योगातील व उपपदार्थ निर्मितीमधील कामगारांना नव्याने 40 टक्के पगारवाढ व अन्य सेवाशर्ती मिळणेसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे माध्यमातून महाराष्ट्र शासन,
राज्य सहकारी साखर कारखाना संघ यांना बदलाची नोटीस देऊन कामगारांच्या पगारवाढ व अन्य सेवा शर्ती मिळणेबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा याबाबत राज्य शासन, साखर संघ यांचेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ न साखर कामगार महाराष्ट्र संघ यांनी संयुक्तपणे साखर कामगारांचे जिल्हा मेळावे घेऊन राज्यातील साखर कामगारांचे भव्य मोर्चा बुधवार (दि. 7) इशारा मोर्चाचे आयोजन केलेच्या पार्श्वभूमीवर भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील बहुसंख्य कामगार सहभागी होणेसाठी विभागवाइज कामगारांशी सुसंवाद करून बहुसंख्य कामगार साखर आयुक्त कार्यालयावर धडकणार आहेत.
राज्यातून फार मोठ्या संख्येने कामगार मोर्चात सहभागी होतील, असे राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी कामगार गेटसभेत जाहीर केले. यावेळी युनियनचे पदाधिकारी, सतीश गावडे, रामचंद्र चोपडे, सुहास निंबाळकर, संजय मुळीक, स्वप्निल गावडे, लक्ष्मण टकले, जनार्दन इंगळे आदी बहुसंख्य कामगार उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
साखर व जोड धंद्यातील कामगारांना 40 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय करणेत यावा.
साखर उद्योगातील रोजंदारी कंत्राटी कामगारांना करारातील तरतुदीनुसार अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे.
साखर कामगारांचे थकित वेतन मिळावे व कायद्याप्रमाणे प्रति महिना पगार मिळावा.
खासगी साखर कामगारांना वेतन मंडळाचे कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. 5) तसेच भाडे तत्वावरील कारखान्यातील थकीत देणे त्वरीत मिळाली पाहिजेत. आशा प्रकारे मागण्यासाठी कामगार साखर आयुक्त कार्यालय येथे जाणार आहेत.





