पुणे जिल्हा | मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार तानाजी शिंदे सन्मानित

भवानीनगर, (वार्ताहर) – हॉकी लेजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न पुरस्कार समिती, ऑलम्पिक वीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती, कालीरामन फाउंडेशन इंडिया, मान अभिमान विकास फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार 2024 इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचे सुपूत्र व एनआयएस कुस्ती कोच पै. तानाजी रामभाऊ शिंदे यांना देण्यात आला.
हा पुरस्कार वितरण समारंभ 29 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) कराड (जि. सातारा) या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पै. तानाजी यांच्या लासुर्णे गावामधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. पै. तानाजी शिंदे यांचा जन्म लासुर्णे या छोट्याशा गावात झाला.
तानाजीला लहानपणापासूनच कुस्तीचे बाळकडू त्यांचे वडील वस्ताद नावाजलेले पै. रामभाऊ शिंदे यांच्याकडून मिळाला त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले प्राथमिक शिक्षणानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या कुस्तीचे गुण बघून त्याला सातारा येथे तालीम संघात सरावास पाठवून दिले.
नंतर तानाजी हा कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीत सरावासाठी गेला त्यावेळी त्याने अनेक राज्य, राष्ट्रीय पातळीवरती पदके मिळवली आहेत.





