पुणे जिल्हा | छत्रपती हायस्कूलच्या आठ खोल्यांचे रंगकाम

भवानीनगर, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील; परंतु मनाने दानशूर असे असलेले व्यक्तिमत्व सणसर सोसायटीचे माजी अध्यक्ष विक्रम निंबाळकर व त्यांचे मित्र बारामतीचे प्रसिद्ध उद्योजक निलेश कुलकर्णी यांनी सामाजिक बांधिलकी जपत व विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे मन प्रसन्न राहावे व त्यातून विद्यार्थ्यांना निर्माण होणारे वातावरणाची ऊर्जा मिळावी या उद्देशाने सणसर येथील श्री छत्रपती हायस्कूलच्या आठ खोल्यांचे रंगकाम करून दिले.
बारामती इंडस्ट्रीजचे पॅकेजिंग व ट्रान्सपोर्ट क्षेत्रा मधील प्रसिद्ध उद्योजक निलेश कुलकर्णी व जाचकवस्ती ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व सणसर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विक्रम निंबाळकर यांनी आठ खोल्यांचे रंगकाम करून दिले व त्यासाठी खर्च येणारा दीड लाख रुपये हे शाळेस देण्यात आले आहेत. याही अगोदर विक्रम निंबाळकर यांनी या शाळेसाठी 52 इंची टीव्ही व त्याचबरोबर एक वर्ग खोली ही पूर्णपणे डिजिटल करून दिली होती.
यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता आले त्याचबरोबर सध्या अनेक विद्यार्थी या शिक्षणाचा लाभ घेत आहेत. समाजामध्ये जीवन जगत असताना आपण जे काही काम करत असतो त्या कामाच्या माध्यमातून जे जमल ती मदत नागरिकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरली जात आहे,
अशा प्रकारची मदत करण्याचा मानस विक्रम निंबाळकर व त्यांचे मित्र व्यावसायिक निलेश कुलकर्णी यांनी केला व सणसरच्या शाळेला ज्या काही खोल्या आहेत. त्या खोल्यांची अवस्था खराब झाली होती अशा आठ खोल्यांना रंगरंगोटी करण्यात आली.
हे काम सुरू असताना श्री छत्रपती हायस्कूल या ठिकाणी विक्रम निंबाळकर व निलेश कुलकर्णी आले असता त्यांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये सुबक अशी रांगोळी काढून वातावरण सुशोभित केले होते. विद्यालयातील इयत्ता सहावी, सातवीच्या लेझीम पथकातील मुलींनी वाजत गाजत विचारमंचावरती आणले. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल सर्जे यांचे हस्ते विद्यालयाच्या वतीने निलेश कुलकर्णी व विक्रम निंबाळकर यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे उपशिक्षक सोनवणे यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यालयाची माहिती दिली. विद्यालयाला आदर्श विद्यालय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विक्रम निंबाळकर व निलेश कुलकर्णी यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक भोईटे आभार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





