Shadu clay : शाडू मातीच्या मूर्तींना मोठी मागणी; मात्र बाजारात संख्या कमी
Shadu clay : वाढता खर्च आणि वजनामुळे लहान मूर्तींना पसंती; उत्पादनात २० ते ३० टक्क्यांनी घट

स्वरुपा जाधव
पिंपरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या खरेदीला सुरुवात झाली असून, पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना नागरिकांकडून मागणी वाढत आहे. मात्र शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा अधिक वेळ, वाढलेला कच्च्या मालाचा व कारागिरीचा खर्च तसेच वाहतूक खर्च यामुळे यंदा मोठ्या आकाराच्या मूर्तींचे उत्पादन कमी झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या उत्पादनात सुमारे २० ते ३० टक्क्यांनी घट झाल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.
शाडू मातीची मूर्ती तयार केल्यानंतर ती पूर्णपणे सुकण्यासाठी साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे मूर्तिकारांना आगाऊ नियोजन करूनच मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार कराव्या लागतात. त्यातच शाडू मातीच्या मूर्तींचा कच्चा माल, कुशल कारागिरी आणि वाहतूक यांचा खर्च अधिक असल्याने या मूर्तींच्या किमतीही वाढल्या आहेत.
तसेच शाडू मातीत मोठ्या मूर्ती बनविणे अवघड असते तसेच या मूर्ती खंडित होण्याची भीती पीओपीच्या तुलनेत अधिक असते. यामुळे शाडूच्या मोठ्या मूर्ती खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे. तसेच शाडूच्या मूर्तींची किंमत देखील पीओपी मूर्तीच्या तुलनेत अधिक असते. यामुळे अनेक कुटुंबांनी यंदा लहान आकाराच्या मूर्तींना पसंती दिली आहे. विशेष म्हणजे, लहान शाडूच्या मूर्तींमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.
शाडूच्या मूर्तींचे वजन हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने मोठी व जड मूर्ती घरापर्यंत नेण्यासाठी दोन-तीन जण सहज उपलब्ध होत होते. मात्र आता विभक्त कुटुंब पद्धती वाढल्याने जड मूर्ती उचलणे आणि घरी नेणे अनेकांना अडचणीचे ठरत आहे. मोठ्या आकाराची मूर्ती घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांपुढे त्यामुळे पीओपीच्या मूर्तींचा पर्याय उपलब्ध राहतो.
पीओपीच्या मूर्ती तुलनेने हलक्या असल्याने त्या उचलणे व घरी नेणे सोपे जाते. त्यामुळे मोठ्या मूर्तींसाठी काही नागरिक पीओपीकडे वळत असले तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या लहान मूर्तींची मागणी यंदा विशेष असल्याचे चित्र आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे शाडूच्या गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. वाढता खर्च व वजनामुळे नागरिक लहान मूर्तींना पसंती देत आहेत. मोठ्या मूर्तींचे उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी घटले आहे.
शाडू मातीच्या मूर्ती सुकण्यासाठी साधारण दोन ते तीन महिने लागतात. त्यामुळे मूर्तिकारांना आगाऊ नियोजन करावे लागते आणि बाजारातील मागणीच्या तुलनेत यंदा कमी मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
सुरेंद्र पासलकर, कल्पेश कला मंदिर, पेण
वारंवार होणाऱ्या पावसामुळे शाडू माती मिळवणे अवघड झाले असून, कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यासोबतच पॅकेजिंग, रंग आणि इतर साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्ती तयार करण्याचा एकूण खर्च वाढला आहे. त्यामुळे मूर्तिकारांना मूर्तींचे दर वाढवावे लागत असून, त्याचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवरही होत आहे.
श्रीकांत खाडे, कल्पेश कला मंदिर, पेण
शाडूच्या गणेशमूर्तींच्या दरात यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारागिरांची संख्या कमी झाल्याने यंदा मूर्तींचे उत्पादन घटले आहे. मोठ्या मूर्ती जड असल्याने ग्राहकांकडून लहान मूर्तींना प्राधान्य दिले जात आहे. नव्या ग्राहकांना मूर्ती शाडू मातीची की प्लास्टरची, याची खात्री नसल्यानेही शाडूच्या मूर्तींच्या खरेदीबाबत संभ्रम निर्माण होत आहे. – कल्पेश हजारे, कल्पेश कला मंदिर, पेण





