पिंपरी – आमदार शंकर जगताप यांनी जनसभेत नदीपात्रातील अनधिकृत भराव काढण्याचे आश्वासन दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे चिंचवडमध्ये नागरिकांनी अनोखे ‘ईमेल आंदोलन’ सुरू केले आहे. मनपा आयुक्त, पर्यावरण विभाग आणि जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना शेकडो नागरिकांनी ई-मेलद्वारे निवेदने पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांनी पवना नदीपात्रातील अनधिकृत भराव, तसेच नदीलगतच्या शेतजमिनींवर उभारलेल्या व्यावसायिक अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे. नदीचा नैसर्गिक उतार बिघडविणाऱ्या या भरावामुळे भविष्यात चिंचवडमध्ये गंभीर पूरस्थिती उद्भवू शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. म्हणूनच भराव तत्काळ हटवून नदीचा मूळ प्रवाह पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुराच्या संभाव्य धोक्याची जाणीव करून देण्यासाठी नागरिकांनी परिसरात जनजागृती सुरू केली असून अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने या चळवळीत सहभागी होत आहेत. अनधिकृत भरावाची ठोस पुरावे सादर करण्याची तयारीही नागरिकांनी अधिकाऱ्यांना दर्शवली आहे. पवना नदी वाचवण्यासाठी चिंचवडमध्ये सुरू झालेल्या या अनोख्या ईमेल आंदोलनामुळे प्रशासनावर तातडीच्या कारवाईचा दबाव वाढला आहे. राजकीय नेत्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष या जनआंदोलनात प्रभाग १८ मधील माजी नगरसेवक आणि निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या संभाव्य उमेदवारांना सहभागी होण्याचे नागरिकांनी भावनिक आवाहन केले होते. मात्र अद्याप कोणताही उमेदवार या मोहिमेला खुला पाठिंबा देऊन पुढे आला नाही, याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.