Power Cut – पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, निगडी, चिंचवड व थेरगाव या परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. उकाड्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी फॅन, कूलर, एसीचा वापर वाढला असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ऐनवेळी उन्हाळ्याच्या कडाक्यात बत्ती गुल होत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत आहेत. मार्च महिन्याच्या मध्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने होणारा बदल, सध्या सुरू असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा, दुपारी उन्हाने होणारी शरीराची काहिली यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. निगडी, चिंचवड, आकुर्डी व थेरगाव या परिसरामधील महावितरणकडून केला जाणारा विद्युत पुरवठा विविध कारणांनी खंडित होत आहे. यामुळे महावितरणकडून सर्वसामान्य ग्रााहकांची गैरसोय होत आहे. महावितरण सध्या सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. यातच रात्री व दिवसभरामध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत महावितरण कार्यालयात विचारणा केली असता काम चालू आहे, थोड्या वेळात विद्युत पुरवठा पूर्ववत होईल, अशी उत्तरे देऊन ग्राहकांची बोळवण केली जाते. मात्र, त्यानंतरही तासनतास हा वीजपुरवठा पूर्ववत होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या वीजप्रवाहामुळे विद्यार्थी, गृहिणी, दुकानदार व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. फक्त आश्वासने, ठोस कृती नाही दरम्यान, वर्षभरापासून सतत मागणी करूनही अद्यापपर्यंत या वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येची महावितरणकडून गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. केबल बदलवणार, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणार, नवीन केबल टाकून देणार, ग्राहकांच्या सर्व तक्रारीचे निवारण केले जाणार, अशा प्रकारची आश्वासने देऊन ग्राहकांची फसवणूक केली जाते आहे, असा आरोप संतप्त नागरिक करत आहेत. तसेच वेळोवेळी याच प्रकारची उत्तरे महावितरण कार्यालयातून निवेदन दिल्यानंतर मिळत असल्याने महावितरणच्या कारभारामुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत. खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यामुळे शीतपेय तसेच दही, ताक या सारख्या पेयांना मागणी वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत; परंतु सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्ध व्यवसाय, शीतपेयांचा विक्री करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकदा दुग्धजन्य पदार्थ उष्णतेने खराब होत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेकदा कमी क्षमतेने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत उपकरणे जळत आहेत. यामुळे मोठे नुकसान होत आहे. यामुळे महावितरणने पूर्ण क्षमतेने आणि कायमस्वरुपी वीजपुरवठा करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.