चिंचवडगाव : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ठेकेदारांची मनमानी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा मनस्ताप दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याची अत्यंत खराब अवस्था, अपूर्ण दुरुस्तीची कामे, अर्धवट सोडलेले खड्डे यामुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याच संदर्भात माजी नगरसेवक विजय शिंदे यांनी परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत नागरिकांच्या संशयाला दुजोरा दिला आहे. शिंदे म्हणाले की, ठेकेदारांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे केली जात असून, त्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. आणखी दुर्लक्ष केल्यामुळे ही स्थिती गंभीर बनली आहे. प्रशासनाने वेळेवर लक्ष न दिल्यास, हा महामार्ग अपघातांचा महाभयंकर केंद्रबिंदू ठरेल, असा इशारा शिंदे यांनी दिला. तसेच तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांकडून देखील सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रोज हजारो प्रवासी या महामार्गाचा वापर करत आहेत. या मार्गाची दुरवस्था ही केवळ वाहनधारकांच्याच नव्हे तर शाळकरी मुलं, वृद्ध आणि रुग्णवाहिन्यांचाही धोका वाढवणारी आहे. आता वेळ आली आहे की प्रशासनाने झोपेचं सोंग थांबवावं आणि संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करत नागरिकांना दिलासा द्यावा.