प्रभात वृत्तसेवा पिंपरी – किरकोळ वादातून एका १५ वर्षीय मुलाला स्टीलच्या दांडियाने मारहाण करून जखमी केले. ही घटना चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी परिसरात गुरुवारी (दि. २) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.आनंद गायकवाड (रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गोपाल अंजप्पा ब्यागर (वय १५, रा. साईबाबा नगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) असे जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून त्याने शुक्रवारी (दि. ३) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादी व त्याचा मित्र आनंदनगर येथील आजादी युवा ग्रुपच्या समोरून जात असताना आरोपीसमवेत किरकोळ धक्का लागल्याच्या रागातून भांडण झाले. यावेळी चिडलेल्या आरोपीने स्टीलच्या दांडियाने अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर मारहाण केली. यात तो जखमी झाला असून रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.