कपिल मिश्रा यांच्यावर 48 तासांची प्रचारबंदी

दिल्लीतील भाजप उमेदवारावर कारवाईचा बडगा
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शनिवारी दिल्लीतील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांच्यावर वादग्रस्त ट्विटबद्दल कारवाईचा बडगा उगारला. मिश्रा यांच्यावर 48 तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे.
मिश्रा दिल्लीतील मॉडेल टाऊन मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नुकतीच ट्विटरवरून भूमिका मांडताना दिल्लीतील निवडणूक भारत आणि पाकिस्तानमधील लढतीसारखी असल्याचे म्हटले. दिल्लीत सध्या शाहीन बाग आणि इतर काही भागांत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात निदर्शने सुरू आहेत.
त्याचा संदर्भ देऊन मिश्रा यांनी शाहीन बागेत पाकिस्तानचा प्रवेश झाला असल्याचे म्हटले. दिल्लीत छोटे-छोटे पाकिस्तान तयार झाले असल्याची टिप्पणी करत त्यांनी आप आणि कॉंग्रेस या पक्षांना टीकेचे लक्ष्य केले. त्या वादग्रस्त ट्विटची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली.
ते ट्विट हटवण्यात यावे आणि मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असा आदेश आयोगाने याआधी दिला. आता कारवाईचे पुढील पाऊल उचलताना मिश्रा यांच्यावर प्रचारबंदी घालण्यात आली आहे. ती बंदी शनिवारी सायंकाळी 5 पासून लागू झाली.





