एकत्रितपणे संकटाला सामोरे जाणार

शरद पवार ः दगा देणाऱ्यांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही
मुंबई : राज्यपालांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, भाजपाला हे बहुमत स्पष्ट करता येणार नाही, असा दावा करतानाच शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस हे तीन्ही पक्ष एकत्र आहेत आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जातील, असा ठाम निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचा सर्वस्वी निर्णय अजित पवारांचा होता. त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, असे स्पष्ट करतानाच देशात पंक्षातरबंदी कायदा असून त्यानुसार आमदारांचे पद जाऊ शकते. तसेच पक्षाला दगा देणाऱ्यांना आम्ही पुन्हा निवडून येऊ देणार नाही, असा इशाराही पवारांनी यावेळी दिला.
आमचा प्रामाणिक कार्यकर्ता जाणार नाही. अजित पवारांबरोबर जे गेले आहेत किंवा जाणार आहेत त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होईल. महाराष्ट्रात सद्या भाजपाच्या विरोधात जनमत आहे. त्यामुळे अजित पवार व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या भूमिकेला मतदारसंघातील मतदारसुद्धा पाठिंबा देणार नाहीत. त्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर पुन्हा होणाऱ्या निवडणूकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांच्या पराभव करण्याची काळजी घेतील, असा इशाराही त्यांनी दिली.
पक्षांतील 54 आमदारांच्या सह्यांची यादी पक्षाकडे होती. मतदारसंघनिहाय आमदारांचे नाव त्यात होते. त्यातील दोन याद्या अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या. त्या त्यांनी राज्यपालांना सादर केल्याची शक्यता आहे. या यादीमुळे 54 जणांचा पाठिंबा आहे कि काय अशी राज्यपालांना वाटले असेल, पण राज्यपालांची ही फसवणूक केल्याचे दिसत आहे, असेही पवार म्हणाले. अजित पवार फुटतील असे मला वाटले नव्हते. 1980मध्ये मला अनेकजण सोडून गेले होते. आमदार 6 शिल्लक राहिले होते. त्यानंतर त्या सगळ्यांचा पराभव झाला. त्यामुळे कुटुंब वेगळं आणि पक्ष वेगळा आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
भाजपाकडून महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राईक
लोकशाहीच्या नावाखाली भाजपने लाजिरवाण खेळ सुरु केला आहे. भाजपचे हे नवहिंदूत्व आहे. लोकशाहीची नवी मूल्ये ते प्रस्थापित करीत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर भाजपाकडून फर्जिकल स्ट्राईक करण्यात आला, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते. आमच्याकडे रात्रीस खेळ चाले असे राजकारण आम्ही करत नाही’. जे काय करायचंय ते आम्ही दिवसाढवळ्या राजकारण करतो, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस एकत्र राहील आणि आम्ही पुढची दिशा ठरवू’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी मालिका “रात्रीस खेळ चाले’ या प्रमाणे भाजप कारस्थाने करीत आहे. भाजपने हरियाणा, बिहारमध्ये सरकार फोडून सरकार स्थापन केले, असा आरोप करतानाच पाठीत कुणी वार करू नये, असा इशाराही उध्दव ठाकरे यांनी दिला.





