Mumbai Bomb Threat : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’..११२ वर तो कॉल आला अन् पोलिसांची झोप उडाली; धक्कादायक सत्य समोर
Mumbai Bomb Threat : मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याचा खोटा कॉल करून पोलीस यंत्रणेची धावपळ उडवणाऱ्या पारनेरमधील तरुणाला पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले.

Mumbai Bomb Threat – मुंबईत बॉम्बस्फोट होणार आणि शहराचा नाश होणार, असा खोटा कॉल करून पोलीस प्रशासनाची धावपळ उडवणाऱ्या एका तरुणाला पारनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मयूर लक्ष्मण साळवे (वय ३०, रा. हिवरे कोरडा, ता. पारनेर) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सकाळी १०.१६ ते १०.१७ च्या सुमारास आरोपी मयूर साळवे याने मोबाईलवरून ‘डायल ११२’ वर दोन वेळा कॉल केला.
या कॉलमध्ये त्याने “मुंबईचा नाश होणार आहे आणि मुंबईमध्ये ब्लास्ट (बॉम्बस्फोट) होणार आहे” अशी धक्कादायक माहिती दिली. मुंबईसारख्या संवेदनशील शहराबाबत अशा प्रकारचा निनावी कॉल आल्याने पोलीस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, गणेश डहाळे आणि अमोल धामणे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून कॉलरचा शोध सुरू केला. अवघ्या काही वेळातच हा कॉल पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गावातून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ पथक पाठवून मयूर साळवे याला ताब्यात घेतले.
दहशतवादी पथकाकडून चौकशी
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अहिल्यानगर येथील दहशतवादी विरोधी पथकाद्वारे आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने केवळ खोटी अफवा पसरवण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला त्रास देण्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर आले. त्याच्याकडे कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा घातपाताचा कट असल्याचे आढळून आले नाही, मात्र त्याच्या या कृतीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल अंबादास टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात आरोपी मयुर साळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार जी. एन. डहाळे करत आहे.





