Domestic Violence : दारूच्या नशेत डोकं फिरलं! पतीचा मुलाला आणि पत्नीला धारदार शस्त्राने संपवण्याचा प्रयत्न
Domestic Violence : रुपीनगर येथील इंद्रायणी हौसिंग सोसायटीत मध्यरात्री थरार; दारू पिऊन आलेल्या पतीची पत्नी आणि मुलाला बेदम मारहाण.

Domestic Violence – घरातील लाइट बंद करून झोपण्यास सांगितल्याने दारू पिऊन आलेल्या पतीने आपल्या पत्नी आणि मुलाला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १० मे) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास रुपीनगर, तळवडे येथील इंद्रायणी हौसिंग सोसायटीत घडली.
मानसी सुभाष उत्तेकर (वय ४०, रा. रुपीनगर, तळवडे) असे जखमी पत्नीचे नाव असून त्यांनी रविवारी (दि. १० मे) रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभाष केशव उत्तेकर (वय ४५, रा. रुपीनगर, तळवडे) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मानसी, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर आणि पती सुभाष हे तिघे रविवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घरात झोपले होते.
सुभाष हा दारू पिऊन आला होता. तो शिवीगाळ करत असल्याने फिर्यादी यांनी घरातील लाइट बंद करून त्याला झोपण्यास सांगितले. या कारणावरून सुभाष याने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. फिर्यादी आणि मुलगा ज्ञानेश्वर या दोघांवर धारदार शस्त्राने वार करत दोघांना गंभीर जखमी केले. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





