Mona Singh: ‘फिल्म इंडस्ट्रीत महिलांची एक्सपायरी डेट असते’… मोना सिंहने का केलं हे वक्तव्य?
Mona Singh: अभिनेत्री मोना सिंह सध्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. लवकरच ती तिच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘कोहरा’च्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे.

Mona Singh: अभिनेत्री मोना सिंह सध्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. लवकरच ती तिच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘कोहरा’च्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे. या सीरिजमध्ये मोना एका पोलीस अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने फिल्म इंडस्ट्रीतील वयाचा मुद्दा आणि महिलांना मिळणाऱ्या भूमिका याबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
पीटीआयशी बोलताना मोना सिंह म्हणाली की, तिने कधीही स्क्रीनवरील वयाची चिंता केली नाही. “मी ४० वर्षांची असूनही ५०-६० वर्षांच्या भूमिका साकारते. लोक मला विचारतात, तुम्ही स्क्रीनवर इतक्या वयस्क का दिसता? पण मला त्याचा फरक पडत नाही. मी कोण आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. मला काहीच सिद्ध करायचं नाही, म्हणून मी अशा भूमिका स्वीकारते,” असं ती म्हणाली.
Mona Singh
मोना सिंहने इंडस्ट्रीतील दुहेरी निकषांवरही भाष्य केलं. “फिल्म इंडस्ट्रीत असं मानलं जातं की महिलांची एक एक्सपायरी डेट असते. हे खूप दु:खद आहे. ६० वर्षांचे पुरुष अजूनही रोमँटिक भूमिका करतात, पण महिलांना तशी संधी दिली जात नाही,” असं ती स्पष्टपणे म्हणाली.
‘बॉर्डर 2’ या चित्रपटात मोना सिंहने सनी देओल यांच्या पत्नीची भूमिका साकारली असून, तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून अवघ्या सहा दिवसांत २१३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
दरम्यान, ‘कोहरा 2’ मध्ये मोना धनवंत कौर या पात्राच्या भूमिकेत दिसणार असून, ही सीरिज ११ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.



