पुणे – राजधानीचे शहर नसूनही पुण्याने गेल्या दहा वर्षांत देशाच्या अर्थकारणात अभूतपूर्व योगदान दिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन, तर पुणे हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन बनले आहे. आपल्या पुण्याला देशातली सर्वोत्तम नॉन-कॅपिटल सिटी बनवण्याचे स्वप्न भारतीय जनता पार्टी पूर्ण करू दाखवेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मोहोळ यांनी प्रभातशी संवाद साधला. त्या वेळी भाजपाच्या संकल्पांविषयी ते बोलत होते. ते म्हणाले, की २०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कष्ट करत आहेत. महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. या दोन्ही स्वप्नपूर्तीमध्ये पुण्याचा लक्षणीय वाटा असणार आहे. म्हणूनच महापालिकेच्या माध्यमातून पुण्याची सर्वांगीण प्रगती करण्याचा भाजपाचा निर्धार आहे. मोहोळ म्हणाले, की २०१४ नंतर देशात व राज्यात भाजपाचे सरकार आले. गेल्या अकरा वर्षांच्या मर्यादित कालखंडात पुण्याने विकासाची अनेक शिखरे गाठली. मोदी सरकार पुण्याला भरभरून देत आहे. ठळक उदाहरणे सांगायचे, तरी भली मोठी यादी होईल. मेट्रोचे स्वप्न मोदींमुळे साकारले. प्रदूषण रोखणाऱ्या प्रत्येकी एक हजार इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत येत आहेत. मोदींनी विमानतळ विस्तारीकरण केल्याने, देशातल्या पहिल्या दहा विमानतळांमध्ये पुण्याचा समावेश झाला. पंतप्रधान आवास योजनेतून २६ हजारांपेक्षा जास्त मध्यमवर्गीयांना हक्काचे घर मिळाले. सर्वसामान्यांसाठी अटलबिहारी वाजपेयी रुग्णालय केंद्राच्या मदतीतून सुरू झाले. पुणे महापालिकेत अवघ्या पाच वर्षात भाजपाने केलेली विकासकामे पुणेकरांनी पाहिली आहेत. पुणेकरांचा कौल प्रचारात स्पष्ट दिसतोय. महापालिकेत पुन्हा भाजपालाच संधी देणार. उज्ज्वल भविष्यासाठी पुण्यात भाजपाच हवी, असे मोहोळ म्हणाले. ‘पुढच्या पाच वर्षांत कात्रज, खडकवासला, खराडी, वाघोली, लोणी काळभोर, सासवडपर्यंत मेट्रो पोहोचवू. पुणे विमानतळापर्यंतही थेट मेट्रोने जाता येईल, असा मार्ग आम्ही प्रस्तावित केला आहे. पुणे विमानतळाचा विस्तार, एम्स रुग्णालय, भारत मंडपमसारखे कन्व्हेन्शन सेंटर, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला समांतर महामार्ग, जीसीसी-डेटा सेंटर हब यासाठी मी दिल्लीतून प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पुणेकर भाजपाला आशीर्वाद देतील, असा विश्वास आहे.’- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री