Pune Election 2026 – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची सांगता गुरुवारी रात्री झाली. या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी (दि.7) मतदान होणार आहे. अधिकृत प्रचार जरी समाप्त होत असला तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील काही तास डोळ्यात तेल घालून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या गुप्त हालचाली टिपण्यावर कार्यकर्त्यांचे लक्ष राहणार आहे. तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी 299 उमेदवार तर पंचायत समितीच्या 146 गणांसाठी 528 इतके उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यंदाच्या निवडणुकीत काही तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे एकत्रितपणे निवडणूक लढवित आहेत. तर काही तालुक्यांंमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून पुणे जिल्ह्यात एकही मोठी जाहीर सभा किंवा भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली नाही. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेस, भाजप, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडूनसुद्धा कुठल्याही मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी प्रचार साध्या पद्धतीने, वैयक्तिक संपर्क, बैठका आणि गाठीभेटींच्या माध्यमातून झाला आहे.गुरुवारी रात्री अधिकृत जाहीर प्रचार समाप्त झाला. गावातील स्थानिक कार्यकर्ते हे मतदारांच्या घरी जाऊन उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. मतदारांपर्यंत व्होटर स्लीप पोहचल्या आहेत किंवा नाही. मतदानासाठी पोलिंग एजंट नेमणे, बूथ उभारणे व याठिकाणी राबणाऱ्या तळातील कार्यकर्त्यांसाठी नाष्टापाण्याची व्यवस्था करणे. फोडाफोडीचे राजकारण, नाराजांचे मन वळविण्याचा प्रयत्न अणि याहून अगोदरच्या रात्री आपली हक्काची मते राखण्यासाठी कार्यकर्त्यांना पुढील काही तास जागता पहारा द्यावा लागणार आहे.