Pune News : माण पंचायत समिती गणात भाजपकडून कारवाई ! पारखी दांपत्याचे निलंबन
जिल्हा परिषद,पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे.

Pune News : जिल्हा परिषद,पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे. माण मधील नवनाथ पारखी व त्यांच्या पत्नी युगंधरा पारखी या दोघांचे निलंबन करण्यात आले आले आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढून, फोन करूनही त्यास प्रतिसाद न देता पक्षाच्या भूमिकेला न जुमानल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पक्षात मनमानी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भाजपने पक्ष शिस्त पाळण्याचा शिस्तीत राहण्याचा संदेश पक्ष नेतृत्वाने दिला आहे.
भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, म्हटले आहे की, भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर शिस्तभंगाविरोधात कठोर पाऊल उचलत नवनाथ पारखी व युगंधरा नवनाथ पारखी यांचे भारतीय जनता पार्टीमधून निलंबन केले आहे.
पक्षाच्या संघटनात्मक धोरणांशी विसंगत कृतीबाबत वरिष्ठ पातळीवर विचारविनिमयानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे वढणे यांनी निलंबन आदेशात स्पष्ट केले आहे. निलंबनानंतर पारखी दाम्पत्याने पक्षाच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात अथवा उपक्रमात सहभागी होऊ नये, असेही आदेशात नमूद केले आहे.
एबी फाॅर्म देताना घोटाळा
भाजपने एबी फाॅर्म देताना केलेल्या घोळामुळे युगंधरा पारखी यांना पक्षाचे अधिकृत कमळ चिन्ह निवडणुकीसाठी मिळाले आहे. तर पक्षाच्या अधिकृत उमेदवार रुपाली बोडके यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पारखी यांना अर्ज मागे घेण्यासाठी सूचना, विनवण्या केल्या, परंतु त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने अपक्ष उमेदवारास पुरस्कृत करण्याची आणि कमळ चिन्हाच्या उमेदवाराला पक्षातून निलंबित करण्याची वेळ भाजपवर आली आहे.
” उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेदरम्यान पक्षाच्या भूमिकेला छेद दिल्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली.पारखी यांनी पक्षाचा आदेश धुडकावून लावला. त्यामुळे फादर बॉडीचा पुणे जिल्ह्याचा “जिल्हाध्यक्ष” या नात्याने पक्षांतील वरिष्ठांच्या आदेशानुसार शिस्तभंग व निलंबनाची ही कारवाई केली आहे.”
शेखर वढणे (पुणे जिल्हाध्यक्ष , दक्षिण- भारतीय जनता पक्ष)” शेखर वढणे हे माझे मित्र आहेत. परंतु मी देखील युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर काम करीत आहे त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहेत का? हे तपासून पाहावे लागेल.त्यांनी माझं निलंबन पत्र काढणं म्हणजे हास्यास्पद बलिशपणा आहे “
– नवनाथ पारखी – (निलंबित पदाधिकारी युवा मोर्चा)





