Ajit Pawar : तब्बल दीड दशक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिलेल्या अजित पवारांचा पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्हा परिषदेसह जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता. विकासकामांत राजकारण टाळू नागरिकांचे जीवनमान गतीमान करण्यासाठी आग्रही असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. पुणे शहराच्या राजकारणात गेली दोन दशके अजित पवारांनी आपले वर्चस्व ठेवले. शहरातील अजित पवारांच्या राजकारणाला २००६ पासून सुरूवात झाली. ही त्यांची वाटचाल अगदी गेल्या महिन्यातील महापालिका निवडणुकीपर्यंत कायम होती. या काळात अजित पवारांचे वेगळेपण पुणेकरांनी पाहिले. विकासकामांच्या आड आपल्याच पक्षाचा कोणी आला, तर त्याला थेट शब्दांत सुनावण्याची अजितदादांची धमक पुणेकरांनी वेगवेगळ्या उदाहरणांतून पाहिली आहे. पुणे पॅटर्नचा प्रयोग पुण्याच्या राजकारणात अजित पवार २००६ पासून खऱ्या अर्थाने सक्रिय झाले. त्यापूर्वी पुण्यात एकहाती काँग्रेसची सत्ता असल्याने तसेच पुण्याच्या राजकारणात स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष घालत असल्याने अजित पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये लक्ष घालत होते. पुण्यात राष्ट्रकूल स्पर्धांचे नियोजन आणि केंद्राकडून शहरांच्या विकासासाठी जेएनएनयुआरएम अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे मंजूर झाली. त्यावेळी शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यातच, काँग्रेसचे महापालिकेतील सर्वेसर्वा सुरेश कलमाडी यांनी बीआरटी प्रकल्पासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यावेळी खड्डे आणि बीआरटीवरून भाजपचे महापालिकेतील तत्कालिन पदाधिकारी तसेच आमदार गिरीश बापट यांनी काँग्रेसला जोरदार विरोध करत खड्ड्यात गेले पुणे ही मोहीम राबविली होती. त्यावेळी काँग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीआधी बीआरटीचा आग्रह धरला होता. विरोधकांनी या प्रकल्पाच्या विरोधात पालकमंत्री अजित पवारांची भेट घेत, हा प्रकल्प मंजूर करू नये अशी विनंती केली. त्यावेळी अजित पवारांनीही विरोधकांना समर्थन देत महापालिकेत हा प्रस्ताव हाणून पाडला. त्यावेळी शहरात काँग्रेसविरोधी वातावरण असल्याने २००७ मधील निवडणुकीत थेट शरद पवारांनीच पुण्यात भाकरी फिरवा असे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रवादीला पालिकेत चांगले संख्याबळ मिळाले. अजित पवार त्यावेळी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवारांनी पुणे पॅटर्न राबविला. त्यात भाजपला विरोधी पक्षनेतेपद, शिवसेनेला उपमहापौरपद तसेच स्थायी समिती व महापौरपद राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवली. पुढे २००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुणे पॅटर्न फुटला. त्यानंतर राष्ट्रवादीने काँग्रेससोबत जात महापालिकेत सत्ता स्थापन केली. यावेळी अजित पवार आणि सुरेश कलमाडी यांच्यात झालेली डिनर डिप्लोमसी राज्यभर चर्चेचा विषय बनली होती. महापालिकेत सत्ता २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत दोन सदस्यांच्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले नसले, तरी पक्षाचे सर्वाधिक ५४ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महापालिकेत एकत्र येत पुन्हा सत्ता स्थापन केली. पुढील पाच वर्षे पुण्याच्या कारभारात अजित पवारांचे वर्चस्व वाढले. त्यानंतर पुढील दोन वर्षांनी आलेल्या मोदी लाटेमुळे केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आली. त्या काळातही अजित पवारांनी पुण्याच्या विकासाला मोठा हातभार लावला. महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, समान पाणी योजनेला गती, पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचे नुतनीकरण, स्वारगेट उड्डाणपूल, अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातील उड्डाणपूल, पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्पाचा आराखडा यांना गती देण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. शहराचा पाणीपुरवठा तसेच जिल्ह्याच्या सिंचनाच्या पाण्यावरून होणाऱ्या वादांवरूनही अनेकदा अजित पवारांनी केलेली वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली. राजकारणातील उलथापालथ २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. मोदी लाटेमुळे या निवडणुकीत भाजपचे तब्बल ९६ नगरसेवक निवडून आले. मनसे, शिवसेना, काँग्रेस या सर्वच पक्षांची पिछेहाट झाली. मात्र, त्या स्थितीतही राष्ट्रवादीचे ३८ नगरसेवक निवडून आणत अजित पवारांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. २०२० मध्ये आलेल्या कोविडवेळी राज्यात मोठी उलथापालथ झाली. त्यावेळी सत्तेत असताना कोणताही भेदभाव न करता महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपला पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी प्रत्येक बाबतीत सहकार्य केले. जंबो कोविड सेंटर, शहरातील ससूनसह इतर शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यावर त्यांनी भर दिल्याचे पुणेकरांनी पाहिले. पुढे दोन वर्षांनी आधी शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांना पुन्हा एकदा पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्यांनी शहराच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यात शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड, हडपसर ते यवत, नगर रस्ता ते शिरूरपर्यंत उड्डाणपूल, पुण्यासाठी दोन रिंग रोड, यवतपर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार, पुरंदर विमानतळापर्यंत मेट्रो व रिंग रोड अशा प्रकल्पांसह शहराच्या प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी वॉर रूमही सुरू केली होती.