Shirur News : खळबळजनक! एका मताची किंमत लाखात? निवडणुकीत ३०-३५ कोटी उडवले; जयश्री पलांडे यांचा गंभीर आरोप
Shirur News : अफाट खर्चामुळे निवडणूक स्तराबाहेर गेली; भाजप नेत्या पलांडे यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप.

Shirur News – केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीने विकासाचा अजेंडा असलेले चारित्र्यसंपन्न उमेदवार दिले होते, मात्र धनदांडग्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पैशापुढे सामान्य घरातील उमेदवारांचा निभाव लागला नाही, असे प्रतिपादन भाजप नेत्या जयश्रीताई पलांडे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. उज्जैन यात्रेचा प्रभाव आणि उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे मिळालेली सहानुभूती यामुळे भाजप उमेदवारांचा पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पलांडे यांनी आपल्या निवेदनात खळबळजनक दावा केला आहे की, या निवडणुकीत उज्जैन यात्रेपासूनचा खर्च, खानपान आणि मतदारांना प्रत्यक्ष पैसे वाटप यामध्ये जवळजवळ ३० ते ३५ कोटी रुपयांचा अपव्यय झाला आहे. त्यांच्या अंदाजानुसार एक मत लाख रुपयांच्या घरात गेले असून, निवडणुका अफाट खर्चाच्या स्तरावर पोहोचल्या आहेत.
या गटात भाजपने जिल्हा परिषदेसाठी विकास गायकवाड, पाबळ पंचायत समितीसाठी दीपक खैरे आणि केंदूर गणासाठी आशाताई साकोरे यांना उमेदवारी दिली होती, ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला.निवडणुकीत विचार आणि ध्येय संपल्याने मतदार दिशाहीन झाला असून, मतदारांनी बारा गावच्या पाणी प्रश्नापेक्षा पैशाला महत्त्व दिले ही मोठी शोकांतिका असल्याचे पलांडे यांनी नमूद केले.
स्वतःच्या भविष्याबाबत गांभीर्य नसलेला मतदार पैशापुढे नतमस्तक होऊन निर्णय घेत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. मात्र, पराभूत झालेले उमेदवार खचून न जाता आपले काम आणि कर्तव्य सातत्याने पार पाडत समाजासमोर आदर्श उभा करतील आणि भविष्यात चांगल्या विचारांचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.





