जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्जांचा पाऊस; उरुळी कांचन आणि केसनंदमध्ये सर्वाधिक चुरस. Pune ZP election: लोणी काळभोर- हवेली तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी एकूण 63, तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 113 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बहुतांश मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत दिसून येत असून काही ठिकाणी एबी फॉर्ममुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेसाठी 6 व पंचायत समितीसाठी 12 उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने जिल्हा परिषदेसाठी 3 व पंचायत समितीसाठी 10 उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेसाठी 3 व पंचायत समितीसाठी 1 उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रत्येकी 1 जागा लढवत आहे. शिवसेना (शिंदे गट) जिल्हा परिषदेच्या 3 व पंचायत समितीच्या 4 जागा, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा परिषदेच्या 3 व पंचायत समितीच्या 2 जागा लढवत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने दोन्ही निवडणुकांत प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व संभाजी ब्रिगेड पक्षाने पंचायत समितीची प्रत्येकी 1 जागा लढवली असून उर्वरित उमेदवार अपक्ष आहेत.जिल्हा परिषदेच्या थेऊर गटात सर्वात कमी 8, तर उरुळी कांचन गटात सर्वाधिक 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत समिती गणांमध्ये केसनंद येथे सर्वाधिक 18, तर लोणी कंद येथे किमान 6 अर्ज दाखल झाले आहेत. लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), बहुजन समाज पक्ष यांच्यासह एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल कांबळे, भाजपकडून पूनम गायकवाड, बसपाकडून निता आवारे, शिवसेना (उबाठा) कडून कलावती ढेले, तर शिवसेना (शिंदे गट) कडून सिंपल कांबळे निवडणूक लढवत आहेत. उर्वरित पाच उमेदवार अपक्ष आहेत. Pune ZP Election लोणी काळभोर पंचायत समिती गणात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा व शिवसेनेसह 7 उमेदवार, तर कदमवाकवस्ती गणात भाजप, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीसह 12 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. लोणी काळभोर गणात भाजपकडून श्वेता काळभोर व विद्या गायकवाड या दोघींना एबी फॉर्म देण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीकडून रेश्मा काळभोर, शिवसेना (शिंदे गट) कडून नंदिनी कोळपे, तर बसपाकडून रेश्मा महानवर रिंगणात आहेत. कदमवाकवस्ती गणात भाजपकडून ज्ञानेश्वर नामुगडे व नकुल शिंदे, राष्ट्रवादीकडून अमोल टेकाळे, तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश भिसे निवडणूक लढवत असून उर्वरित उमेदवार अपक्ष आहेत. एकंदरीत हवेली तालुक्यातील ही निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच अंतिम लढतीचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. एबी फॉर्ममुळे गोंधळ महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोरी टाळण्यासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचे वाटप केले; मात्र काही मतदारसंघात एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म मिळाल्याने उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच अधिकृत उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे.