PCMC News : महापालिकेचा बिल्डरांना दणका! प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणे भोवले; १५० व्यावसायिकांवर कारवाई
PCMC News : रात्री १० नंतर बांधकामांना बंदी, पाणी फवारणी आणि ग्रीन नेट बंधनकारक; नियमावलीची पायमल्ली करणाऱ्या विकासकांवर महापालिकेची कठोर देखरेख.

PCMC News – पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या बांधकाम प्रकल्पांमुळे होणारे धूळ व वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम विभागाकडून कडक नियमावली लागू केली आहे. बांधकाम प्रकल्पांदरम्यान प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर दंडात्मक कारवाईसह आवश्यक असल्यास बांधकाम परवानगीही रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला होता. मात्र, याकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष करुन नियमांची पायमल्ली केल्याचे समोर आले आहे. अशा दीडशेहून अधिक बिल्डरांना (विकसक) महापालिकेकडून नोटीस बजावून बांधकाम स्थगिती देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांमुळे परिसरात धूळ उडणे, रस्त्यांवर माती साचणे आणि हवेची गुणवत्ता खालावणे, याबाबत नागरिकांकडून तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिक आणि विकसकांना प्रदूषण नियंत्रणासाठी काही सक्तीच्या अटी घातल्या आहेत. मात्र, याकडे बांधकाम व्यावसायिक दुर्लक्ष करत असल्याने शहरातील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे.
वेगाने वाढणारे शहरीकरण, वाढती वाहनसंख्या आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, औद्योगिक परिसर तसेच बांधकाम सुरू असलेल्या भागांमध्ये धुळीचे प्रमाण वाढले असून, वाहनांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिकेकडून बांधकामांवर पाणी फवारणी, धूळ रोखण्यासाठी पत्रे बसविणे, रस्ते नियमित स्वच्छ करणे तसेच इतर नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक ठिकाणी अपुरी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक वाढविणे, हरित पट्टे वाढविणे, बांधकामांवर कठोर नियंत्रण आणि औद्योगिक उत्सर्जनावर प्रभावी देखरेख ठेवणे आवश्यक आहे.
मात्र प्रत्यक्षात बांधकाम व्यावसायिकाकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक भागात सर्रासपणे नियमाचे उल्लंघन केले जात असून उपाययोजनाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिकेकडून सुमारे दीडशेहून अधिक बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावून बांधकाम नियमानुसार उपाययोजना न केल्यास बांधकाम स्थगिती देण्यात येईल असा इशारा दिला आहे.
कोणत्या भागात जास्त वायू प्रदूषण
शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, भोसरी, चिखली, मोशी, निगडी, पिंपरी आणि तळवडे परिसरात औद्योगिक आणि वाहतूक हालचाली मोठ्या प्रमाणावर होत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. त्यातच मेट्रो, उड्डाणपूल आणि रस्ते विस्ताराची कामे सुरू असल्याने धुळीचे प्रमाण वाढत आहे. अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवले जात असल्याने वाऱ्यासोबत धूळ उडून वातावरण दूषित होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.
“पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण बांधकामामुळे वायु व ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. त्यानुसार महापालिकेकडून संबंधित बांधकामांवर नियंत्रण ठेवत नियमावली तयार करण्यात आली आहे. रात्री दहा ते सकाळी सात वाजेपर्यंत बांधकामे बंद ठेवण्यात येत आहेत. याशिवाय अन्य नियमानुसार बांधकाम व्यावसायिकांनी काम करावे असे निर्देश दिलेले आहेत. तसेच प्रत्येकाने उपाययोजनांवर लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, नियमावलीकडे दुल॔क्ष करणाऱ्यावर नोटीस बजावल्या आहेत.”
– सुनिल भागवानी, सह शहर अभियंता, महापालिका.





