ZP Elections : जिल्हा परिषद कोणाची? निंबूत–कांबळेश्वर गटात तिकीटयुद्ध ; अजित पवार गटावर लक्ष

प्रभात वृत्तसेवा
सोमेश्वरनगर – महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या भागात भक्कम स्थितीत असून, उमेदवारीसाठी पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांची चळवळ वाढली आहे.यावेळी झेडपी सदस्य कोण होणार? हा प्रश्न सध्या निंबूत-कांबळेश्वर जिल्हा परिषद गटात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. झेडपी आणि पंचायत समिती सदस्यपदासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांनी तयारीला लागण्यास सुरुवात केली आहे.
अनेक जण यावेळी माझीच वर्णी लागणार या आत्मविश्वासात असल्याचे चित्र दिसत आहे. या गटात राष्ट्रवादी (शरद पवार गट), भाजप, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि आरपीआय या पक्षांकडूनही उमेदवारीची हालचाल सुरू झाली आहे; मात्र अजित पवार गटाचे वर्चस्व ठळकपणे दिसते. गडदरवाडी, खंडोबाचीवाडी, निंबूत, वाघळवाडी, करंजे पूल, सोरटेवाडी, सस्तेवाडी, होळ, सदोबाची वाडी, कोराळे खुर्द, लाटे, माळवाडीलाटे, शिरसणे आणि कांबळेश्वर या गावांमध्ये अजित पवार गटाचा प्रभाव लक्षणीय आहे.
मागील विधानसभा निवडणुकीतही या भागातील मतदारांनी अजित पवार यांना मोठं समर्थन दिलं होतं. दरम्यान, परिसरात गुप्त बैठका, शुभेच्छा बॅनरबाजी आणि गावागावांत राजकीय गाठीभेटींची लगबग सुरू झाली आहे. अनेक कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या क्लुप्त्या आजमावत आहेत. तिकीट कोणाला मिळणार, याकडे मतदारांचेही लक्ष लागले आहे.
मतदारांचा अभ्यास – यशाची गुरुकिल्ली..
आजचा मतदार विचारशील आणि जागरूक आहे. तो फक्त पक्षनिष्ठेवर मत देत नाही, तर उमेदवाराच्या प्रत्यक्ष कामगिरी, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि वर्तनावर मत ठरवतो. जातीय आणि राजकीय समीकरणांसोबत मतदारांचा मूड ओळखणं हेच यशाचं गमक ठरणार आहे. सोशल मीडियावर प्रचार झगमगाटात असला, तरी स्थानिक प्रश्नांवर दिलेली उत्तरं आणि प्रत्यक्ष उपस्थिती हेच मतदार जिंकण्याचं प्रभावी साधन ठरणार आहे.
निर्णय जनतेचाच..
या गटात काही अनुभवी नेते पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, तर काही तरुण चेहरेही चर्चेत आहेत. ग्रामपातळीवरील नातेसंबंध, विकासाच्या अपेक्षा आणि पक्षीय समीकरणं – या सार्यांचा संगमच निकाल ठरवणार आहे. शेवटी, सर्वेक्षणं आणि अंदाज काहीही सांगोत, पण निकाल ठरवणार आहे तो मतदारांचा एकच क्लिक! म्हणूनच या वेळी झेडपी सदस्य कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर आकड्यांत नाही, तर मतदारांच्या मनात दडलं आहे.





