ZP Election Result 2026: 12 जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर; जिल्हानिहाय पक्षीय बलाबल पाहा, कुठे कोणाची सत्ता?
ZP Election Result 2026: रायगडपासून लातूरपर्यंतच्या १२ जिल्ह्यांत ७३१ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य ठरले आहे.

ZP Election Result 2026: राज्यातील बहुप्रतिक्षित १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले असून, अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे, तर काही ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
रायगडपासून लातूरपर्यंतच्या १२ जिल्ह्यांत ७३१ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य ठरले आहे. शनिवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज लागलेल्या निकालांनी राज्याच्या ग्रामीण राजकारणाची नवी समीकरणे मांडली आहेत.
जिल्हा निहाय पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे: सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत विजयी उमेदवारांचे निकाल आहेत. अनेक जागांवर अजून निकाल येणे बाकी आहे.

प्रमुख ठळक वैशिष्ट्ये:
कोकणात शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व: रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवत ३६ जागांवर विजय मिळवला आहे. तर सिंधुदुर्गात भाजपने मुसंडी मारली आहे.
पुण्यात अजित पवारांचा करिष्मा: पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ४३ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात चुरस: सातारा आणि सोलापूरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्तेच्या जवळ पोहोचला आहे. सांगलीत मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत आणि काँग्रेसमध्ये त्रिशंकू परिस्थिती पाहायला मिळत आहे.
मराठवाड्यात भाजपची मुसंडी: छत्रपती संभाजीनगर आणि परभणीमध्ये भाजपने मोठी झेप घेतली असून सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.
या निकालांमुळे स्थानिक पातळीवर आता सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. अनेक ठिकाणी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.





