प्रभात वृत्तसेवा राहू – दौंड तालुक्यातील बेट परिसरातील राहू गट व राहू गण व खामगाव गणात वेगवेगळे आरक्षण निश्चित झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. परंतु अनेक जणांनी बऱ्याच दिवसांपासून तयारी केली. मात्र, आरक्षणामुळे त्यांच्या इच्छेवर पाणी पडले आहे.अशातच गट व गण रचना बदलल्यामुळे अनेक नवीन इच्छुकाना अजूनही पूर्णपणे अंदाज बांधता येईना. कारण मागील गट व गणांचा होम टू होम अभ्यास इच्छुकांचा झालेला होता. परंतु नवीन गट रचनेत अनेक नवीन गावे समाविष्ट झाल्यामुळे पूर्णपणे स्पष्टता येत नाही.अशी अवस्था इच्छुकांची झाली आहे.तसेच राहू गटाचे आरक्षण हे सर्वसाधारण असल्यामुळे स्पर्धा वाढण्याची शक्यता जरी असली पात्र उमेदवारांची वानवा दोन्ही बाजूंना जाणवणार आहे आहे, हे नक्की. कारण जर गटात योग्य उमेदवार दिला नाही तर त्याचा परिणाम गणावर देखील होऊ शकतो. त्या मुळे गटात कोणाला उमेदवारी दिली जाते, यावर पुढील अंदाज बांधता येतील. तसेच राहू गट सर्वसाधारण ,राहू गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व खामगाव गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आल्यामुळे उमेदवारांचा परिपूर्ण त्रिकोण करणे वरिष्ठांना सोपे जाणार आहे. राहू गटात मराठा,धनगर तसेच माळी समाजाचे आपापले स्थान आहे व आरक्षणामुळे या तिन्ही वर्गाला संधी मिळणार आहे. त्या मुळे जो परिपूर्ण उमेदवारीचा त्रिकोण साधेल तो अधिक तो यशस्वी होईल, असे सध्या चित्र आहे. पाव्हणे रावळेंवर भिस्त.. या गटामध्ये धनगर समाजाचे चांगले प्राबल्य आहे. तसेच पूर्ण गटामध्ये सगे सोयऱ्यांची मोठी गुंतागुंत आहे. त्या मुळे या गोष्टींचा जो अभ्यास करून नियोजन करेल त्याला त्याचा परिणाम दिसून येईल. नेत्यांचा करिष्मा चालणार.. राज्य पातळीवर जरी काहीही निर्णय होत असले तरी दौंडमध्ये कुल – थोरात अशीच लढत होणार आहे. त्या मुळे राहू गटात देखील योग्य उमेदवारीबरोबर नेत्याच्या करिष्मा देखील त्या उमेदवाराला तारणार आहे. कारण उमेदवाराची कितीही मोठी ताकत असली तरी गॉड फादरशिवाय निवडून येणे शक्य नाही. यवत व राहू गटात चुरस.. दौंड पंचायत समिती सभापती पदासाठी असणारे आरक्षण हे यवत व राहू गटाआंतर्गत असल्यामुळे या मध्ये होणाऱ्या सभापतीसाठी कोण बाजी मारणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. संभाव्य उमेदवार.. -राहू जिल्हा परिषद गट – सागर शेलार,दत्तोबा तांबे,विजय नागवडे,भास्कर देवकर,डॉ.संदीप खेडकर,दिलीप देशमुख सर,गणेश चव्हाण,बाळासाहेब थोरात इत्यादी. -राहू गण -वैशाली डुबे,सुजाता टेळे,राणी शिंदे.जयश्री शिंदे,मनिषा शिंदे.अनिता शिंदे इत्यादी. -खामगाव गण – सुखदेव चोरमले,शरद कोळपे,बाळासाहेब शिंदे,योगेश मदने,संतोष गरदरे,संदीप जगताप,ज्योती झुरुंगे इत्यादी.