ZP Election 2026: जुन्नरमध्ये ‘एका’ जागेसाठी चक्क ६ ते ७ उमेदवार; पाहा तुमच्या गटात किती उमेदवार?

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जुन्नर तालुक्यात राजकीय उत्साहाचे उधाण पाहायला मिळाले. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह पंचायत समिती कार्यालय परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करत अर्ज सादर केले. उमेदवारांच्या प्रचंड संख्येमुळे आणि शेवटच्या क्षणी झालेल्या गर्दीमुळे निवडणूक प्रशासनाचे कामकाज बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी एकूण ५० उमेदवारांनी आपले नशीब अजमावले आहे. तसेच पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अशा प्रकारे तालुक्यातील एकूण २४ जागांसाठी १४० उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, यामुळे जुन्नरचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
आठ गटांनुसार दाखल अर्जांची संख्या
उदापूर-डिंगोरे ६, ओतूर-धालेवाडी ६, आळे-पिंपळवंडी १०, राजुरी-बेल्हे ४, बोरी बुद्रुक-खोडद ५, नारायणगाव-वारूळवाडी ५, सावरगाव-कुसूर ८, बारव-तांबे ६.
१६ गणांनुसार दाखल उमेदवारांची संख्या
उदापूर ९, डिंगोरे ५, ओतूर ६, धालेवाडी तर्फे हवेली ४, पिंपळवंडी ७, आळे ५, राजुरी ६, बेल्हे ५, बोरी बुद्रुक ६, खोडद ३, नारायणगाव ५, वारूळवाडी ५, सावरगाव ७, कुसूर ६, बारव ४, तांबे ७.




