ZIM vs NZ : न्यूझीलंडने मोडला ६७ वर्षांचा विक्रम, कसोटी इतिहासातील नोंदवला तिसरा सर्वात मोठा विजय

ZIM vs NZ New Zealand register 3rd big Victory : बुलवायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने यजमान झिम्बाब्वेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात तीन दिवसांतच दणदणीत विजय मिळवला आणि मालिका 2-0 ने खिशात घातली. दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये निराशाजनक कामगिरी झाली. यजमान संघ दुसऱ्या डावात अवघ्या 117 धावांत गारद झाला आणि त्यांना एक डाव आणि 359 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डाव आणि धावांच्या फरकाने हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
झकारी फाउल्केसने पदार्पणातच केली कमाल –
न्यूझीलंडने पहिल्या डावात 3 बाद 601 धावा करून डाव घोषित केला. तिसऱ्या दिवशी पदार्पणवीर वेगवान गोलंदाज झकारी फाउल्केसने अप्रतिम गोलंदाजी करत कसोटी कारकिर्दीतील पहिल्यादाच पाच विकेट्स घेतल्या. त्याने 9 षटकांत केवळ 37 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आणि झिम्बाब्वेचा दुसरा डाव 117 धावांत आटोपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय मॅट हेन्री आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. न्यूझीलंडसाठी हा त्यांच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे, तर झिम्बाब्वेसाठी सर्वात मोठा पराभव ठरला.
Test series win in Bulawayo!
Zak Foulkes claims his first Test five-for (5-37) and the best match figures by a New Zealander on Test debut (9-75). Catch up on the scorecard | https://t.co/DnWSGE9t8b #ZIMvNZ #CricketNation 📷 = Zimbabwe Cricket pic.twitter.com/vxah1GxQjP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 9, 2025
कसोटी क्रिकेटमधील डाव आणि धावांनी सर्वात मोठे विजय:
1. इंग्लंड – एक डाव आणि 579 धावा (वि. ऑस्ट्रेलिया, 1938)
2. ऑस्ट्रेलिया – एक डाव आणि 360 धावा (वि. दक्षिण आफ्रिका, 2002)
3. न्यूझीलंड – एक डाव आणि 359 धावा (वि. झिम्बाब्वे, 2025)
4. वेस्ट इंडीज – एक डाव आणि 336 धावा (वि. भारत, 1958)
हेही वाचा – Shaheen Shah Afridi : शाहीन आफ्रिदीने मोडला शमीचा विक्रम, वनडेत असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांनी ठोकली शतकं –
दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या फलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. डेव्हॉन कॉनवेने 153 धावांची खेळी साकारली, तर रचिन रविंद्रने नाबाद 165 धावा कुटल्या. याशिवाय हेन्री निकोल्सनेही 150 धावांची खणखणीत खेळी साकारली. या तिघांच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघ पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी झाला.





