T -20 World Record : एकाच सामन्यात दोनदा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड; झिम्बाब्वे-नामिबिया सामन्यात घडला नवा इतिहास
नामिबिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी२० त्रिकोणीय मालिकेतील (T -20 World Record) ३१ ऑगस्टचा सामना क्रिकेट इतिहासाच्या सुवर्णपानांवर नोंदवला गेला आहे.

T -20 World Record : नामिबिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी20 त्रिकोणीय मालिकेतील (T -20 World Record) 31 ऑगस्टचा सामना क्रिकेट इतिहासाच्या सुवर्णपानांवर नोंदवला गेला आहे.
झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यात खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात (T -20 World Record) झिम्बाब्वेने नामिबियाचा ५ धावांनी थरारक पराभव केला खरा, पण या सामन्यात घडलेल्या एका अजब आणि ऐतिहासिक घटनेने जगभरातील क्रीडाप्रेमींचे डोळे विस्फारले. २०२१ साली प्रस्थापित झालेला एक आंतरराष्ट्रीय विक्रम या एकाच सामन्यात एकदा नव्हे, तर अवघ्या काही तासांच्या अंतराने दोनदा मोडीत निघाला.
सामन्यात नाणेफेक जिंकून नामिबियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या १०१ धावांवर त्यांचे ६ प्रमुख फलंदाज तंबूत परतले. संघ संकटात असताना सातव्या क्रमांकावर रयान बर्ल आणि ब्रॅड इव्हान्स ही जोडी मैदानात एकत्र आली.
या दोघांनी अवघ्या ४८ चेंडूंत नाबाद ९४ धावांची वादळी भागीदारी रचत संघाची (T -20 World Record) धावसंख्या २० षटकांत ६ बाद १९५ पर्यंत पोहोचवली. यासह त्यांनी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल सॅम्स आणि मार्कस स्टॉइनिस यांनी न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या ९२ धावांच्या सातव्या विकेटच्या विक्रमाला मागे टाकून नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
परंतु, झिम्बाब्वेचा हा जागतिक विक्रम फार काळ टिकू शकला नाही. १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाची अवस्था आणखी बिकट झाली आणि अवघ्या ७६ धावांवर त्यांचेही ६ फलंदाज बाद झाले. यानंतर नामिबियाच्या झेन ग्रीन आणि बुइसिंग व्होल्चेंक या जोडीने मैदानावर असा चमत्कार केला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
या दोघांनी सातव्या विकेटसाठी तब्बल ११० धावांची विक्रमी भागीदारी रचली. काही तासांपूर्वीचा झिम्बाब्वेने रचलेला ९४ धावांचा विक्रम नामिबियाच्या जोडीने त्याच सामन्यात थेट मोडीत काढला.
विजयासाठी अवघ्या १० धावांची गरज असताना नामिबियाची ही ऐतिहासिक जोडी फुटली आणि संपूर्ण संघ १९० धावांवर सर्वबाद झाला. अवघ्या ५ धावांनी नामिबियाचा पराभव झाला असला, तरी एकाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकाच विक्रमाची (T -20 World Record) दोनदा झालेली तोडफोड क्रिकेटच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरली गेली आहे.






