Krunal Pandya Comeback : आयपीएलच्या दमदार कामगिरीचे मिळणार गिफ्ट! ५ वर्षांनंतर आरसीबीचा स्टार खेळाडू पुन्हा भारतीय संघात दिसणार?
Krunal Pandya Comeback : आरसीबीचा स्टार खेळाडू भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. तो शेवटचा २०२१ मध्ये भारतासाठी खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

Krunal Pandya Comeback Team India Axar Patel Poor Form Afghanistan T20 Series RCB Heroics : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचे उपकर्णधारपद भूषवणारा स्टार अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. आयपीएलनंतर झालेल्या इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावरील ७ सामन्यांत अक्षरला केवळ ४८ धावा आणि अवघे ४ विकेट्सच मिळवता आल्या. १३ सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेच्या पार्श्वभूमीवर, निवड समिती डावखुऱ्या फिरकी अष्टपैलूचा पर्याय शोधत असून, अनुभवी कृणाल पंड्याचे (Krunal Pandya) तब्बल पाच वर्षांनंतर संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आरसीबीला लागोपाठ दोन जेतेपदे जिंकून देणारा शिल्पकार –
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, कृणालने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. मात्र, आयपीएल २०२५ आणि २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला बॅक-टू-बॅक चॅम्पियन बनवण्यात कृणालचा मोलाचा वाटा राहिला. या दोन्ही मोसमांत मिळून त्याने ३१ विकेट्स मिळवल्या आणि ८.५ पेक्षा कमी इकॉनॉमीने धावा दिल्या. याशिवाय १५ डावांत ३३५ धावांची उपयुक्त फटकेबाजी करत त्याने आपला अष्टपैलू फॉर्म सिद्ध केला आहे.
आंतरराष्ट्रीय अनुभव अन् फायनलचा ‘मॅच विनर’ खेळाडू!
🚨 KRUNAL PANDYA FOR INDIA T20I COMEBACK 🚨
– Krunal Pandya is being discussed for his return to the India T20I Team. (Sahil Malhotra/TOI). pic.twitter.com/eCfJETO4hN
— Tanuj (@ImTanujSingh) August 31, 2026
३५ वर्षीय कृणाल पंड्याने भारतासाठी आतापर्यंत ५ एकदिवसीय आणि १९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून त्यात १७ विकेट्स टिपले आहेत. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू राहिलेला कृणाल आयपीएलच्या अंतिम सामन्यात दोनदा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. दबावाच्या क्षणी सामना जिंकून देण्याचा त्याचा दांडगा अनुभव टीम इंडियासाठी मोलाचा ठरू शकतो.
फिरकीमध्ये अनपेक्षित वेगवान ‘बाउन्सर्स’; फलंदाजांसाठी ठरणार डोकेदुखी –
कृणालच्या फिरकी गोलंदाजीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चेंडू स्पिन करण्यासोबतच तो अचानक वेगाने टाकणारा उसळता ‘बाउन्सर’ चेंडू वापरतो, ज्यावर मोठे फटके खेळणे फलंदाजांना अत्यंत कठीण जाते. टी-२० सारख्या फटाफट क्रिकेटमध्ये जिथे धावांचा पाऊस पडतो, तिथे कृणालची नियंत्रित गोलंदाजी अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी मालिकेत भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकते.





