Satara: जिल्हा परिषद देणार आदर्श अभियंता पुरस्कार
Satara भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर हा अभियंता दिन जिल्हा परिषद मुख्य इमारतीच्या प्रांगणात उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.

Satara: अभियंत्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने ‘आदर्श अभियंता पुरस्कार’ देण्याची घोषणा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी अभियंता दिन कार्यक्रमप्रसंगी केली. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर हा अभियंता दिन जिल्हा परिषद मुख्य इमारतीच्या प्रांगणात उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करुरून सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राजू भोसले बोलत होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले व राहुल देसाई, भीमराव काका पाटील, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता संजय खोत (उत्तर) व विद्याधर शिंदे (दक्षिण), प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता किशोर शेजवळ, मृदा व जलसंधारण विभागाचे अभियंता कुंभार यांच्यासह विविध विभागांचे उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श अभियंता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याचे राजू भोसले यांनी सांगितले. ग्रामीण भागाच्या विकासामध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून रस्ते, पूल, शाळा, आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा, जलसंधारण यांसह विविध कामांसाठी अभियंते ग्रामीण विकासाचा कणा म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी असेल, असे श्री. भोसले यांनी नमूद केले.
अभियंता अंकिता सुतार यांनी प्रास्ताविक केले. अभियंता विजय खामकर यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष अभियंता कृष्णात फडतरे यांनी सर विश्वेश्वरैय्या यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या दूरदृष्टी, शिस्त, कार्यतत्परता आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर देशाच्या विकासाला दिलेले योगदान आजच्या अभियंत्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.





