Satara: गौराईच्या स्वागताची साताऱ्यात लगबग
Satara गौराईच्या स्वागतासाठी शहरातील सदाशिव पेठ, खण आळी, मोती चौक, राजवाडा परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. गौराईचे आकर्षक मुखवटे, साड्या, पैठण्या, दागिने, सजावटीचे साहित्य तसेच पूजेच्या साहित्याला मागणी वाढली आहे.

Satara: लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर आता शहरात ज्येष्ठा- कनिष्ठा गौराईच्या स्वागताची लगबग शिगेला पोहोचली आहे. गौराईचे आगमन येत्या गुरुवारी होणार असल्याने सुवासिनींची घराघरांत तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठाही महिलांच्या गर्दीने फुलल्या आहेत. गौराईचे आवाहन, पूजन आणि विसर्जनाचे विधी सलग होणार असल्याने घराची स्वच्छता, सजावट, नैवेद्य आणि पूजेच्या साहित्याची जमवाजमव अंतिम टप्प्यात आली आहे.
गौराईच्या स्वागतासाठी शहरातील सदाशिव पेठ, खण आळी, मोती चौक, राजवाडा परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. गौराईचे आकर्षक मुखवटे, साड्या, पैठण्या, दागिने, सजावटीचे साहित्य तसेच पूजेच्या साहित्याला मागणी वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने गौराईची आरास करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध झाल्याने महिलांकडून त्यांची आवर्जून खरेदी केली जात आहे. गौराईच्या दागिन्यांची खरेदी हा या तयारीतील महत्त्वाचा भाग ठरत आहे. बाजूबंद, ठुशी, जोडवी, नथ, बेंटेक्सचे दागिने, बांगड्या यांसह विविध आभूषणांना सराफ बाजारात मागणी वाढली आहे. गौराईला पैठणी किंवा आकर्षक साडी नेसविण्यासाठी महिलांकडून साड्यांचीही खरेदी केली जात आहे. त्याचबरोबर गौराईच्या आराशीत भर घालण्यासाठी विविध सजावटीच्या साहित्याची दुकानेही गर्दीने गजबजली आहेत.
गौराईच्या नैवेद्यासाठी घरगुती फराळाच्या तयारीलाही वेग आला आहे. लाडू, चकली, चिवडा, करंजी यांसह विविध गोडधोड पदार्थ बाजारात उपलब्ध असून, तयार फराळ खरेदी करण्याकडेही महिलांचा कल दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा असल्याने शेपूच्या भाजीला विशेष मागणी आहे. बाजारात शेपूची भाजी सध्या सुमारे ५० रुपये पेंडी दराने विकली जात आहे. गणरायाच्या आगमनानंतर अवघ्या काही दिवसांतच गौराईचे आगमन होत असल्याने महिलांवर तयारीची लगबग वाढली आहे. घराची स्वच्छता, सजावट, आरास, पूजेची तयारी आणि नैवेद्याची जुळवाजुळव अशा कामांमध्ये सुवासिनी व्यस्त आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाबरोबरच आता गौराईच्या आगमनाने साताऱ्यातील उत्सवी वातावरण आणखी रंगतदार होणार आहे.
दीड दिवसाच्या बाप्पांना साताऱ्यात भावपूर्ण निरोप
दीड दिवसाच्या गणपतींना मंगळवारी दुपारी भावपूर्ण निरोप देण्यात आला .एकीकडे दहा दिवसाच्या बाप्पांचे जोरदार स्वागत झाल्यानंतर दुसरीकडे दीड दिवसाच्या बाप्पांसाठी पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सुद्धा ऐकू येत होता. घरगुती गणेशांचे कृत्रिम हौदामध्ये आणि विसर्जन कुंडांमध्ये विसर्जन करण्यात आले. नगरपालिकेने शहरात पाच ठिकाणी विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे. पाच ठिकाणी कृत्रिम तळी तयार करण्यात आली असून पाच तळ्यांवर 33 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आवाहन केल्याप्रमाणे काही श्रीमूर्तींचे दानही करण्यात आले .





