Satara: शेतकरी करणार क्यू आर कोडद्वारे खतांचे बुकिंग
Satara जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची सुलभ, पारदर्शक व गरजेनुसार उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एफएफएस प्रणालीद्वारे रासायनिक खत विक्रीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Satara: जिल्ह्यात दि. २५ सप्टेंबरपासून रासायनिक खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता घरबसल्या क्यू आर कोडद्वारे खताचे बुकिंग करता येणार आहे. उपलब्ध विक्रेत्यांची निवड करुन क्यू आर कोडद्वारे खताचे बुकिंग होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची सुलभ, पारदर्शक व गरजेनुसार उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एफएफएस प्रणालीद्वारे रासायनिक खत विक्रीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी दुकानांमध्ये अथवा वितरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी किंवा रांगा लावण्याची आवश्यकता राहणार नाही. शेतकरी आपल्या मोबाइलवरुन उपलब्ध खतांची माहिती पाहून आपल्या पिकासाठी उपलब्ध विक्रेत्याची निवड करुन आवश्यक खताचे बुकिंग करु शकणार आहेत.
शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये Google Play Store वरून “Framework for Fertilizer Sale” (FFS) App डाउनलोड करावे. त्यानंतर FFS App मध्ये लॉगिन करावे. शेतकऱ्यांना आधार आधारित किंवा Farmer ID आधारित लॉगिनची सुविधा उपलब्ध असणार आहे. शेतजमिनीची माहिती तपासावी. लॉगिन केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या नोंदणीकृत सर्व सर्व्हे नंबर व क्षेत्राची माहिती प्रणालीमध्ये दिसेल. संबंधित सर्व्हे नंबर, शेतजमीन निवडल्यानंतर ज्या शेतजमिनीसाठी खताची आवश्यकता आहे ती जमीन, सर्व्हे नंबर निवडावा. पिकाची माहिती व आवश्यक खताचे प्रमाण नोंदवावे. संबंधित पिकानुसार आवश्यक असलेल्या खताचे प्रमाण प्रणालीमध्ये नोंदवावे. खत उपलब्ध असलेला विक्रेता निवडावा. शेतकऱ्याने नोंदवलेल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध खत असलेल्या विक्रेत्यांची यादी प्रणालीमध्ये दिसेल. त्यापैकी आपल्या सोयीच्या विक्रेत्याची निवड करता येईल. विक्रेता निवडल्यानंतर शेतकऱ्याच्या मोबाइलवर संबंधित व्यवहारासाठी QR Code generate होणार आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रासायनिक खतांच्या वितरण व्यवस्थेत पारदर्शकता, मागणीवर आधारित वितरण, उपलब्धतेची माहिती आणि विक्री व्यवहाराची डिजिटल नोंद यांना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि अधिकृत विक्रेत्याकडून आवश्यक खत मिळण्यास मदत होईल. खत वितरण व्यवस्थेवर प्रशासनाला प्रभावी देखरेख ठेवणे सुलभ होणार आहे. शेतकऱ्यांनी दि. २५ सप्टेंबरपासून या प्रणालीचा वापर करूनच रासायनिक खतांची खरेदी करावी. खत खरेदी करताना अनधिकृत व्यक्ती किंवा अनधिकृत विक्रेत्याकडून खत खरेदी करु नये. कोणत्याही प्रकारचे अनावश्यक खत घेण्याची सक्ती, लिंकिंग, जादा दराने विक्री, काळाबाजार किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधित बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन गजानन ननावरे यांनी केले आहे.
एफएफएस प्रणालीचे शेतकऱ्यांना होणारे फायदे
- गरजेनुसार खत उपलब्ध
- खताच्या लिंकिंगला आळा
- काळाबाजारास प्रतिबंध
- कृषी उपयोगाच्या युरियाच्या गैरवापरावर नियंत्रण
- बनावट, डुप्लिकेट खत विक्रीवर नियंत्रण
- घरबसल्या उपलब्धता पाहता येणार





